ट्रेनला लटकला मोबाईल चोर
पाटणा, 15 सप्टेंबर : चोरी झाली की चोराला पकडा चोराला पकडा असं इतर लोक ओरडतात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात स्वतः चोरच मला पकडा, सोडू नका, धरून ठेवा, असं ओरडताना दिसला. ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करायला गेलेल्या या चोरट्यासोबत असं काही घडलं की तो प्रवाशांकडे आपल्या जीवाची भीक मागू लागला. सोशल मीडियावर ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्या या चोराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ट्रेनमध्ये मोबाईल चोरीची प्रकरणं नवीन नाहीत. चालत्या ट्रेनच्या दरवाजा किंवा खिडकीतील प्रवाशांच्या मोबाईलवर चोरटे डल्ला मारतात. प्रवासी कितीही सतर्क असले तरी चोरटे आपला डाव साधतातच. पण मोबाईल चोरीचा चोरट्यांचा हा प्रयत्न प्रत्येक वेळी यशस्वी होईलच असं नाही. अशाच मोबाईल चोराला प्रवाशांनी पकडलं आणि त्याला अशी भयंकर शिक्षा मिळाली की पाहून तुम्हालाही धडकी भरेल. हे वाचा - VIDEO - भोळ्याभाबड्या आईच्या हाती मुलाने दिलं लक्झरी कारचं स्टेअरिंग; जोशात तिने… व्हिडीओत पाहू शकता चोर ट्रेनच्या खिडकीला लटकताना दिसतो आहे आणि ट्रेन सुसाट धावते आहे. ट्रेनच्या आत चोराचे दोन्ही हात आहेत. दोन्ही बाजूंनी दोन प्रवाशांनी त्या चोराचा एकेएक हात धरला आहे. चोरटा खिडकीबाहेर मोठमोठ्याने ओरडतो आहे. माझा हात सोडू नका, माझा हात सोडू नका असं तो सांगतो आहे. मोबाईल चोरायला आलेला चोर आपल्या जीवाची भीक मागतो आहे.
बिहारच्या बेहुसरायमधील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. मीडिया रिपोर्टनुसार मंगळवारी रात्री समस्तीपुर-कटिहार पॅसेंजर ट्रेन साहेबपुर कमाल-उमेशनगरदरम्यान होती. त्यावेळी ट्रेनच्या खिडकीजवळ बसलेला प्रवासी मोबाईलवर बोलत होता. जशी ट्रेन सुरू झाली तसा चोर तो मोबाईल चोरायला गेला. तेव्हा प्रवाशाने सतर्क राहून त्याचा हातच धरला.
प्रवाशांनी चोराला रंगेहाथ पकडलं आणि त्याला चालत्या ट्रेनच्या खिडकीतच लटकवलं. प्रवासी आपला हात सोडतील आणि आपला जीव जाईल याची भीती त्याला वाटत होती. त्यामुळे तो प्रवाशांना हात सोडू नका अशी विनवणी करताना दिसतो. तसंच आपल्या दातांनी खिडकी पकडण्याचाही प्रयत्न करताना तो दिसतो. साहेबरपूर कमालहून खगडियापर्यंत तब्बल 15 किलोमीटरपर्यंत त्याला असंच लटकवून ठेवलं होतं. नंतर जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे वाचा - ती लग्नपत्रिका घेऊन प्रवास करणार, इतक्यात अधिकाऱ्यांनी तिला विमान तळावर थांबवलं; अखेर समोर आलं मोठ रहस्य Video व्हायरल @akshay019 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंतर या प्रवाशांमुळेच या चोराचा जीव वाचला आणि चोरालाही आयुष्यभराची अद्दल घडली. आता तो आयुष्यात चोरी करण्याचा विचार स्वप्नातही करणार नाही.