वंदे भारत एक्स्प्रेस
नवी दिल्ली, 19 जानेवारी : स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत; मात्र याच स्मार्टफोनचे अनेक दुष्परिणामदेखील आहेत. स्मार्टफोनमुळे अनेकांना सेल्फी काढण्याची सवय लागली आहे. अलीकडे अनेक जण कोणत्याही ठिकाणी सेल्फी काढतात. आंध्र प्रदेशातल्या एका व्यक्तीला सेल्फीची हीच सवय फार महागात पडली आहे. सेल्फी घेण्यासाठी ही व्यक्ती वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मध्ये चढली होती; मात्र सेल्फी घेतल्यानंतर तो माणूस खाली उतरणार तितक्यात ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे आपोआप बंद झाले आणि त्या व्यक्तीला दीडशे किलोमीटर प्रवास करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणम यादरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला 15 जानेवारी 2023 रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. ही देशातली आठवी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ट्रेन आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर एका दिवसाने ती ट्रेन जेव्हा राजमुंद्री स्टेशनवर आली तेव्हा ही व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी डब्यात चढली होती; मात्र ती व्यक्ती ट्रेनमधून बाहेर पडण्यापूर्वीच ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. हे वाचा - Reels करणाऱ्या मुलाला बस चालकाने शिकवली चांगलीच अद्दल, Video सोशल मीडियावर व्हायरल ट्रेनमध्ये अडकलेल्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ही व्यक्ती हाताने ट्रेनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिकीट कलेक्टर (टीसी) येण्यापूर्वी तो ट्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो; पण दरवाजा उघडत नाही. व्हिडिओतली व्यक्ती विनातिकीट ट्रेनमधून प्रवास करत असल्याचं लक्षात आल्यानंतर टीसी त्या व्यक्तीला खडसावतो. त्याने या व्यक्तीला वेडा म्हटलं आहे. त्यानंतर टीसीने त्याला पुढच्या विजयवाडा स्टेशनबद्दल माहिती दिली आणि तिथे उतरण्यास सांगितलं. ट्रेन त्याच स्टेशनवर थांबणार होती. त्यामुळे त्या व्यक्तीला सुमारे 150 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागला. हे वाचा - चालत्या बसमध्ये अशी चढली तरुणी, व्हिडीओ पाहून बसेल धक्का देशातली पहिली वंदे भारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी धावली होती. तेव्हापासून ही ट्रेन चर्चेत आहे. या ट्रेनची अनेक ठिकाणी भटक्या प्राण्यांशी धडक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे टीकाही झालेली आहे. काही ठिकाणी या रेल्वेवर दगडफेकही झालेली आहे; मात्र ही ट्रेन पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात.
अनेक जण ही ट्रेन पाहण्यासाठी स्टेशनवर येतात आणि फोटो काढण्यासाठी ट्रेनमध्ये चढतात. नागरिकांनी असं करू नये, असा सल्ला रेल्वे प्रशासनानं दिला आहे; मात्र नागरिक हा सल्ला गांभीर्याने घेत नसल्याचं निदर्शनास आलं आहे.