55 पेक्षा कमी रँक मिळालेल्या पदार्थात साखरेचं प्रमाण कमी असल्याचं मानलं जातं. आंब्याला 51 GI रँक आहे. म्हणजेच डायबिटीस रुग्ण आंबा खाऊ शकतात.
मध्य प्रदेश, 07 जून: उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते फळांचा राजा आंब्याच्या (Mango) आगमनाचे. भारतातील हापूस आंबा (Hapus Mango) जगभरात प्रसिद्ध आहे. त्यासह अनेक वेगवेगळ्या जातीचे आंबे देशभरातीलच नव्हे तर जगभरातील खवय्यांची रसना तृप्त करत असतात. प्रत्येकालाच आंबा खाण्याची इच्छा असते. आंब्याचे दर्दी चाहते कितीही महाग असला तरी आंबा विकत घेतात. देशातील एका जातीचा आंबा तर 500 ते हजार रुपयांना एक याप्रमाणे विकला जातो. इतका महाग आंबा आश्चर्य वाटला नां? पण हे खरं आहे. हा आंबा आहे मध्य प्रदेशातील ‘नुरजहाँ’ (Noorjahan Mango) आंबा. आंब्यांची राणी म्हणून प्रसिद्ध असलेला हा आंबा आपल्या भरभक्कम आकारमानासाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलिराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा **(Katthiwada)**भागातच याचं उत्पादन होतं. मध्य प्रदेशसह गुजरातमध्ये हा आंबा लोकप्रिय आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अनुकूल हवामानामुळे या आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं असून हा आंबा यावर्षी सर्वाधिक भाव मिळवून देत आहे. मूळचा अफगाणिस्तानातील मानल्या जाणाऱ्या या आंब्याची लागवड इंदोरपासून अंदाजे 250 किलोमीटर अंतरावर गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या अलिराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागातच केली जाते. जानेवारी -फेब्रुवारीपासून या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते आणि जूनपासून आंबे पिकून तयार होण्यास सुरुवात होते. हा आंबा एक फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याच्या बाठीचे (Kernel) वजन 150 ते 200 ग्रॅम दरम्यान असू शकतं अशी माहिती स्थानिक उत्पादकांनी दिली आहे. या आंब्याचे चाहते फळ झाडावर असतानाच याचं बुकिंग करून ठेवतात. हेही वाचा- भारतात वितरित झालेल्या लशीसंदर्भात WHO नं दिली मोठी माहिती ‘माझ्या बागेत असलेल्या तीन झाडांनी 250 आंबे दिले असून या फळाची किंमत 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. मध्यप्रदेशासह गुजरातमधील लोकांनी देखील आधीच या आंब्यासाठी बुकिंग केलं आहे. यावेळी या आंब्याचे वजन 2 ते 3.5 किलोपर्यंत असेल’, असं काठीवाडातील आंबा लागवड करणारे शिवराजसिंह जाधव यांनी सांगितलं. या वेळी या आंब्याचे पीक चांगलं आलं आहे. पण कोविड-19 साथीमुळे (Covid-19 Pandemic) व्यापारावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी प्रतिकूल हवामानामुळे नूरजहां आंब्याची झाडं नीट बहरली नाहीत. 2019 मध्ये या जातीच्या एका आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो होते आणि लोकांनी त्याला 1200 रुपये असा भाव दिला होता, अशी माहिती काठीवाड्यात ‘नूरजहाँ’ आंब्याची लागवड करणारे तज्ज्ञ इशाक मन्सुरी यांनी दिली.