प्रतीकात्मक फोटो.
लंडन, 21 ऑक्टोबर : आपल्या डोक्यावर घनदाट केस हवेत असं प्रत्येकाला वाटतं. फक्त महिलाच नव्हे तर अगदी पुरुषांनाही डोक्यावर केस हवेत असतात. टक्कल पडलेलं कुणालाच आवडत नाही. त्यामुळे केस गळत असतील, टक्कल पडत असेल तर अनेकांना चिंता वाटतेच आणि अशाच चिंतेतून एका व्यक्तीने मात्र आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. उपचारानंतर त्याच्या डोक्यावर केस आले नाहीतच पण त्याचा उलट परिणाम झाला. म्हणून त्याने अखेर स्वतःलाच संपवलं. यूकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. वेल्सच्या एन्गलेसीमध्ये राहणारा 47 वर्षांचा जॉन ग्वेनडॅफ ओवेनने केसांसाठी धक्कादायक पाऊल उचललं आहे. तो आपल्या आईसोबत राहत होता. आपल्या राहत्या घरातच त्याने आत्महत्या केली आहे. डॉक्टरच्या माहितीनुसार त्याला 2004 सालानंतर बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर झालं होतं. ही एक मानसिक समस्या आहे. ज्यात व्यक्ती आपलं शरीर, चेहरा आणि आपल्यातील इतर उणीवांबाबत चिंताग्रस्त असतो. जॉनलाही याच पद्धतीचं डिप्रेशन झालं होतं. त्यामुळे त्याची अवस्था खूप बिघडली होती. हे वाचा - Stop Hair Fall: केस गळतीनं तुमचं टेन्शन वाढवलंय? आहारात या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर डेली स्टारच्या रिपोर्टनुसार त्याने 2004 साली हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. त्याचा परिणाम दिसून आलं नाही. या प्रक्रियेनंतर त्याच्या डोक्यावर खुणा राहिल्या होत्या. या खुणा पाहून लोक आपली चेष्टा करतील अशी भीती त्याला वाटत होती.
2004 सालीच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने कसाबसा त्याचा जीव वाचला. पण गेल्या वर्षी त्याचं वागणं पुन्हा बदललं. त्याच्या स्वभावात बदल झाला. तो पुन्हा हेअर ट्रान्सप्लांटमुळे चिंतेत होता. त्यानंतर एका पुलावरून त्याने उडी मारली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं 16 दिवस तो रुग्णालयात होता. पण तो डिप्रेशनमधून काही बाहेर पडत नव्हता. त्यातूनच त्याने आपल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं. घरात गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. केस प्रत्यारोपण म्हणजे काय? जर तुमच्या डोक्यावरील केस गळले असतील आणि तुम्हाला टक्कल दिसू लागले असेल, तर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटद्वारे टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस लावू शकता. केस प्रत्यारोपण ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्लास्टिक सर्जन किंवा त्वचाविज्ञान सर्जन डोक्याच्या टक्कल असलेल्या भागावर केसांचे प्रत्यारोपण करतात. यासाठी तज्ज्ञ सहसा डोक्याच्या मागच्या बाजूचे किंवा दोन्ही बाजूचे केस काढून टाकतात. केस प्रत्यारोपणापूर्वी रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून भूलही दिली जाते. हे वाचा - केस गळतीचे कारण तुमची हेयर वॉशची चुकीची पद्धत तर नाही ना? हे आहेत उपाय केस प्रत्यारोपणाचे अनेक प्रकार आहेत. परंतु, त्याच्या दोन पद्धती सर्वात लोकप्रिय आहेत आणि बहुतेक लोक त्यांचा प्रत्यारोपणासाठी वापर करतात. पहिली पद्धत म्हणजे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन आणि दुसरी पद्धत म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्सट्रॅक्शन. या दोन्ही पद्धतींनी लावलेले केस नैसर्गिक दिसतात आणि तुम्ही ते कापून डायही करू शकता.