व्हायरल व्हिडीओ
मुंबई 20 डिसेंबर : लहान मुलांच्या हालचाली फार चपळ आणि अनपेक्षित असतात. कोणत्या क्षणाला ते काय करतील याचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे धोकादायक गोष्टींपासून त्यांना दूर ठेवलं जातं किंवा तसा सल्लाही दिला जातो. मात्र, काही पालक याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: गाड्यांच्या बाबतीत आजकालचे पालक फारच निष्काळजी झाल्याचं चित्र आहे. काहीजण तर आपल्या लहान मुलांच्या हातात दुचाकी देतात. या प्रकारचे काही व्हिडिओ व्हायरल देखील झाले आहेत. अशा गोष्टींमुळे अनेकदा अपघात होण्याचीही शक्यता असते. सध्या लहान मुलाशी संबंधित अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्कूटीवर बसली आहे आणि गाडीच्या लेगस्पेसमध्ये एक लहान मूल उभं आहे. हे ही पाहा : बुल फाइटचा हृदय पिळवटून टाकणारा Video, पाहून बसेल धक्का स्कूटीवर लहान मूल बसलेलं असेल तर इंजिन बंद केलं पाहिजे, अशा कॅप्शनखाली हा व्हिडिओ शेअर झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली असल्याचं म्हटलं जात आहे. सोसायटीत लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झाला आहे. घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोपेड गाडीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर गाडीच्या लेगस्पेसमध्ये एक लहान मुलं उभं राहिलेलं आहे. ही व्यक्ती गाडी सुरू ठेवून कुणाशी तरी बोलत आहे. या दरम्यान लहान मुलं अचानक गाडीचं अॅक्सिलेटर फिरवतो. अचानक वाढलेल्या वेगामुळे गाडी समोरच्या भिंतीवर जाऊन आदळते. लहान मुलाची हालचाल इतक्या वेगाने होते की स्कूटीवरील व्यक्ती काहीही करू शकत नाही. उलट ती जोरात खाली पडते. या प्रकारामुळे ती व्यक्ती घाबरून जाते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं दिसत आहे. गाडी पडल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य येऊन दोघांना उचलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. व्हिडिओतील व्यक्तीनं हेल्मेट घातलेलं नाही शिवाय मुलं समोर उभं असताना गाडी सुरूच ठेवली आहे, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. हा व्हिडिओ सर्वांसाठी धडा आहे. अशा छोट्या चुका मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतात, असंही काहींचं म्हणणं आहे. आजकाल अनेक पालक, विशेषत: मुलांच्या आई त्यांना शाळेत सोडवायला जाताना स्कूटीसारख्या मोपेड गाड्यांचा वापर करतात. बहुतेक मुलं लेगस्पेसमध्ये उभी राहतात. अशा महिलांनी या घटनेतून धडा घेऊन विशेष काळजी घेतली पाहिजे.