कराची, 04 एप्रिल : पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचा धोका सर्वात जास्त आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानंतरही सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवत मुस्लीम बांधव शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी एकत्र जमले होते. लॉकडाऊन आणि जमावबंदीच्या नियमांचं उल्लंघन करून हा नमाज अदा करण्यात येत होता. त्याच वेळी पाकिस्तानमधील पोलिसांनी मुस्लीम बांधवांना रोखलं. तिथे बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. संतप्त जमावानं पोलिसांवरच हल्ला चढवला. जमावाला आवरण हाताबाहेर जात होतं आणि पोलिसांकडे घटनास्थळी संख्याबळ कमी असल्यानं पोलिसांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल की जमाव किती संतापलेला आणि पोलिसांवर कशा पद्धतीनं त्यांनी हल्ला केला आहे.
हे वाचा- पुणे पोलिसांनी वाचवला वृद्ध महिलेचा जीव; लॉकडाऊनमध्ये होतंय सगळ्यांकडून कौतुक
हा व्हिडीओ शुक्रवारचा असल्याची माहिती मिळत आहे. दोन ट्विटर युझर्सनी आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 100 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तर पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 2458 केसेस समोर आल्या आहेत. त्यापैकी 783 रुग्ण हे कोरोना संशयित असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांना जेव्हा या जमावानं घेरलं तेव्हा त्यातून काही आवाज आले ‘उन्हे मारो मत’, मात्र त्यांचे आवाजही या गोंधळात दबून गेले. एका नागरिकानं या पोलिसांचा जीव वाचवण्यात मदत केल्याची माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे. याआधी भारतात गुरुवारी इंदूरमध्ये तर शुक्रवारी कर्नाटकात पोलीस आणि डॉक्टरांच्या पथकावर हल्ला कऱण्यात आला होता. हे वाचा- Corona Virus : लॉकडाउनपासून मुंब्य्राला वगळण्यात आलंय का?