बंगळुरू 25 मे : कोरोना चाचणी (COVID-19 Test) करण्यासाठी योग्य प्रकारे सहकार्य न केल्याचं म्हणत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका अल्पवयीन मुलाला जबरी मारहाण (BBMP Officials Mercilessly Beaten Minor) केल्याची घटना समोर आली आहे. मला कोरोनाची लक्षणं जाणवत नसल्यानं चाचणी करायची नसल्याचं या मुलानं म्हटलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. कर्नाटकच्या चिकपेट मतदारसंघातील धर्मराय स्वामी मंदिर वार्डातील आहे. ब्रुहत बंगळुरू महानगरपालिकेच्याच काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर याबाबतची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की दोन अधिकारी एका अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करत आहेत. यातील एकानं मुलाचा हात पकडून ठेवला आहे, तर दुसरा व्यक्ती त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर चापट मारत आहे. हा मुलगा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हात पकडून ठेवल्यानं त्याला काहीही करत येत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. नंतर, एका अधिकाऱ्यानं मुलाची मान धरली असून तो मुलाचं डोकं टेबलावर दाबत आहे. यादरम्यान, शेजारुन जाणारे दोघंजण या अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शेजाऱ्याच्या टेबलावर बसलेल्या अधिकाऱ्यांमधील कोणीही या मुलाच्या मदतीला येत नाही.
या व्हिडिओबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. राज्य सरकारनं लक्षणे नसलेल्या लोकांची कोरोना चाचणी न करण्याच्या सूचना दिलेल्या असताना या मुलावर चाचणी करण्यासाठी इतका दबाव का टाकला जातोय, असा सवाल उपस्थित होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांनी अशी तक्रारही केली आहे, की आम्हाला चाचणी करायची असतानाही अधिकाऱ्यांनी लक्षणं नसल्याचं सांगत चाचणी करण्यास नकार दिला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना बीबीएमपी आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले, की याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ते म्हणाले, की बीबीएमपी अधिकारी लोकांना कोरोना चाचणीची सक्ती करू शकत नाहीत. हा व्हिडिओ व्हायरल होताच याच परिसरातील असेच काही व्हिडिओ अनेकांनी शेअर केले आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये काही अधिकारी एका व्यक्तीला धक्के देत बाहेर काढत असल्याचं दिसत आहे.