धक्कादायक! सहा वर्षांच्या विद्यार्थ्यानं केला शिक्षिकेवर गोळीबार
नवी दिल्ली, 07 जानेवारी : लहान मुलं निरागस असतात, असं म्हटलं जातं. त्यांनी खोडकरपणा केला तरी त्यातून एखाद्याचा जीव जाईल, अशी शक्यता फारच कमी असते. मात्र, आजकाल काही मुलं याला अपवाद ठरत आहेत. लहान वयामध्येही मुलं धोकादायक वस्तू हाताळण्यास शिकत असल्यामुळे त्यांच्या हातून एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरात घडलेल्या या घटनेत फर्स्ट ग्रेड वर्गातील (पहिली) सहा वर्षांच्या विद्यार्थ्यांनं आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडली आहे. पोलीस आणि शाळा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (6 जानेवारी) वर्गातील किरकोळ भांडणादरम्यान ही घटना घडली. या घटनेमध्ये शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : तरुणीने जॉब सोडताच स्वत:च्याच श्रद्धांजलीचा आखला प्लान, कारण ऐकून चक्रावाल!
‘न्यूपोर्ट न्यूज’ या शहरातील पोलीस आणि शाळेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकेवर गोळी झाडली आहे. रिचनेक एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या या गोळीबारात कोणताही विद्यार्थी जखमी झालेला नाही. मात्र, तिशीची शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्र्यू यांनी पत्रकारांना सांगितलं की, उपचारांनंतर या शिक्षिकेची प्रकृती काहीशी सुधारली आहे.
पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडील हँडगनदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. ड्र्यू यांनी पत्रकारांना सांगितलं की, हा गोळीबार अपघात नव्हता. तो जाणीवपूर्वक केलेला जीवघेणा हल्ला आहे. यापूर्वी, शहरामध्ये संपूर्ण शाळेच्या परिसरात गोळीबार करत कुणी फिरल्याची घटना घडल्याचं आठवत नाही. मात्र, या आधी वर्गामध्येच किंवा शाळेतील एखाद्या ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
न्यूपोर्ट न्यूजमधील पब्लिक स्कूलनं फेसबुकवर सांगितलं की, या घटनेनंतर पालक आणि विद्यार्थी व्यायामशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले होते. व्हर्जिनिया डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच्या वेबसाइटनुसार रिचनेक पब्लिक स्कूलमध्ये बालवाडीपासून ते पाचव्या इयत्तेपर्यंत शिकणारे सुमारे 550 विद्यार्थी आहेत. या घटनेमुळे सोमवारपर्यंत शाळा बंद ठेवली जाणार असल्याचं शाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा : विमानातच दोनदा हृदयविकाराचा झटका आला अन् बेशुद्ध पडला व्यक्ती, सहप्रवाशाने असे वाचवले प्राण
न्यूपोर्ट न्यूज हे आग्नेय व्हर्जिनियामधील सुमारे एक लाख 85 हजार लोकवस्तीचं शहर आहे. हे शहर तेथील शिपयार्डसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमानवाहू नौका आणि यूएस नेव्हीची इतर जहाजं तयार केली जातात.
अमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारलादेखील शस्त्र परवाना विधेयकाबाबत पुनर्विचार करावा लागला आहे.