प्रतिकात्मक फोटो
मुंबई 25 डिसेंबर : लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस पती-पत्नीमध्ये मधुर संबंध असतात; पण संसार म्हटलं, की भांड्याला भांडं लागणं आलचं. मुलांचा विषय असो किंवा कौटुंबिक ताण, अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण होतात. अमेरिकेत एका जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला आणि पत्नी रागाने घरातून निघून बाजारात गेली. ती थोड्या वेळानं घरी आली ती करोडपती होऊनच. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रकार अमेरिकेतल्या मिशिगनमधल्या एका जोडप्याच्या बाबतीत घडला आहे. या जोडप्याला मार्केटमधून चिकन व इतर साहित्य आणायचं होतं; पण त्यासाठी पतीला वेळ नव्हता आणि पत्नीही कामात व्यग्र होती. त्यामुळे या पती-पत्नीमध्ये मार्केटमध्ये जाण्यावरून किरकोळ वाद झाला. अखेर पत्नी रागारागात मार्केटमध्ये गेली; पण जेव्हा ती घरी परतली, तेव्हा ती तब्बल 30 कोटींहून अधिक रुपयांची मालकीण झाली होती. हे ही पाहा : Video : आधी विजेच्या तारेवर चढला आणि… प्रेयसीसाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल मूड बदलला अन्… डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, पतीसोबत वाद झाल्यानंतर 49 वर्षीय महिला मार्केटमध्ये चिकन व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी गेली होती. तिथे तिचा मूड बदलला आणि तिने लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. घरी येऊन तिनं ते तिकीट स्क्रॅच केलं, तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तब्बल 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची लॉटरी तिला लागली होती. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानं पती-पत्नी खूप खूश झाले; मात्र त्यांनी आपली ओळख उघड केलेली नाही. महिलेने सांगितला घटनाक्रम मिशिगन व्हीआयपी मिलियन्स लॉटरीचं तिकीट विकत घेतलेल्या संबंधित महिलेने सांगितलं, की ‘तो थँक्सगिव्हिंगचा आदला दिवस होता. माझ्या पतीने मला विचारलं, की तू दुकानात जाऊन चिकन आणू शकतेस का? पण मी त्याला नकार दिला. त्यामुळे आमच्यात वाद झाला. अखेर मी स्वत:च मार्केटमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर मी चिकन व इतर साहित्यासह लॉटरीचं तिकीट घेतलं. मग काही वेळानं मी घरी आले आणि ते तिकीट स्क्रॅच केलं. तेव्हा मला कळलं की मी लॉटरी जिंकले आहे. त्यावेळी आनंदाने बक्षिसाची रक्कमही तपासली नाही. जेव्हा मी लॉटरी ऍपवर पाहिलं, तेव्हा मला 30 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाल्याचं समजलं व मला याचा धक्काच बसला.’
संबंधित महिला पुढे म्हणाली, ‘लॉटरीची रक्कम पाहिल्यानंतर मी थरथर कापू लागले. माझा श्वास घेण्याचा वेग वाढला होता. मला हृदयविकाराचा झटका आल्यासारखं कुटुंबीयांना वाटत होतं; पण मला आनंद झाला होता. खरं तर माझे पती मार्केटमध्ये गेले नाहीत, हे चांगले झाले. अन्यथा एवढी मोठी रक्कम मिळाली नसती.’ पती-पत्नीचा हा वाद असाही फायद्याचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.