लंडन 04 मे : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार अतिशय झपाट्यानं होत आहे. या काळात अनेक थक्क आणि हैराण करणाऱ्या बातम्याही समोर येत आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. यात एक 55 वर्षीय महिला रुग्णालयात (Hospital) दाखल झाली. महिलेचा हर्नियाचं ऑपरेशन झालं. या काळात दहा दिवस ही महिला रुग्णालयातच राहिली. या दहा दिवसात दररोज तिची कोरोना चाचणीही करण्यात आली. महिलेला कोरोना प्रूफ वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. महिलेचा दररोजचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र तरीही दहा दिवसांनंतर तिचा मृत्यू (Woman Tests Positive for Covid 19 After Death) झाला. यानंतर रुग्णालयानं महिलेला कोरोना असल्याचं सांगितल्याचं तिच्या मुलानं म्हटलं आहे. हे प्रकरण ब्रिटनमधील स्टॅनफोर्डशायरमधील आहे. इथल्या रॉयल स्टोक युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात डेबरा शॉ नावाची महिला भर्ती झाली होती. या महिलेचा दहा दिवसांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांना अंतिम दर्शनासाठी बोलावलं गेलं. कुटुंबीयांना असं सांगण्यात आलं, की महिलेला कोरोना नव्हता. मात्र, रुग्णालयातच रिकव्हरीदरम्यान तिला निमोनिया झाला. या काळात रुग्णालयातील डॉक्टरांनीही कुटुंबीतील सदस्यांची गळाभेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं. मात्र, आता प्रकरण वेगळ्याच दिशेनं फिरलं. द सन डॉट यूकेच्या वृत्तानुसार, डेबरा शॉ यांच्या मुलाचं वय 32 वर्ष आहे. त्यांच्या मुलानं सांगितलं, की नंतर आम्हाला हे सांगण्यात आलं की माझी आई कोरोना पॉझिटिव्ह होती. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर ती कोरोनाबाधित होती, तर सलग दहा दिवस तिचा अहवाल निगेटिव्ह कसा आला? आणि जर ती खरंच पॉझिटिव्ह होती, तर संपूर्ण कुटुंबाला तिच्याजवळ घेऊन जात, सगळ्यांचा जीव धोक्यात का घातला? आता महिलेचे कुटुंबीय रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल करण्याच्या विचारात आहेत.