सईदा लुलू मिन्हाज झैदी
नवी दिल्ली 27 जुलै : उच्च शिक्षण घेण्यासाठी आजकाल सर्वांत प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश कसा मिळेल? यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतात. काही विद्यार्थी तर शिक्षणासाठी परदेशातही जातात. हैदराबादमधील अशीच एक तरुणी पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेली होती. आता हिच तरुणी शिकागोतील रस्त्यांवर अन्नपाण्याविना फिरताना दिसत आहे. शिवाय तिच्या वस्तूही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. सईदा लुलू मिन्हाज झैदी असं या तरुणीचं नाव आहे. तिचा वाईट परिस्थितीतील व्हिडिओ समोर आल्यानंतर तिची आई सईदा वहाज फातिमा यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदत मागितली आहे. फातिमा यांनी जयशंकर यांना पत्र लिहून मुलीला भारतात परत आणण्याची विनंती केली आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.भारत राष्ट्र समितीचे नेते खलीकुर रहमान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हे पत्र शेअर केलं असून, सोशल मीडियावर ते व्हायरल झालं आहे. या पत्रासह रहमान यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये क्षीण आवाजात मिन्हाज एका व्यक्तीचे आभार मानताना दिसत आहे. तिच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की, त्या व्यक्तीनं तिला जेवण आणि पाणी दिलं आहे. ती व्यक्ती तिला भारतात हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासनही मिन्हाजला देत आहे. गर्लफ्रेंडसाठी ओलांडली सीमा, 4 विमाने अन् टॅक्सीने केला 16 हजार किमी प्रवास परराष्ट्रमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आईनं आपल्या मुलीच्या करुण कहाणीची माहिती दिली आहे. “माझी मुलगी सईदा लुलू मिन्हाज झैदी तेलंगणातील मौला अली येथील रहिवासी आहे. ऑगस्ट 2021 मध्ये ती डेट्रॉईटमधील ट्राईन युनिव्हर्सिटीत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेली होती. ती सतत आमच्या संपर्कात होती. पण, गेल्या दोन महिन्यांपासून तिचा आणि माझा संपर्क झाला नव्हता. अलीकडेच आम्हाला हैदराबादमधील दोन तरुणांमार्फत समजलं की, माझी मुलगी डिप्रेशनमध्ये आहे आणि कोणीतरी तिचं सामानही चोरलं आहे. त्यामुळे तिची उपासमार झाली आहे. नुकतीच माझी मुलगी अमेरिकेमधील शिकागो शहरातील रस्त्यावर दिसली,” अशी माहिती फातिमा यांनी पत्रात दिली.
वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दूतावास आणि शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगावं, अशी विनंती फातिमा यांनी केली आहे. जेणेकरून त्यांच्या मुलीला भारतात परत येता येईल. मोहम्मद मिन्हाज अख्तरच्या मदतीनं आपल्या मुलीचा शोध घेता येईल, असंही फातिमा यांनी सांगितलं आहे. इंडिया टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, सईदा लुलू मिन्हाजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हैदराबादमधील अनेक ट्विटर युजर्सनी कमेंट्स करून आश्चर्य व्यक्त केलं आहे. फहाद मकसुसी नावाच्या व्यक्तीनं, तिला परत हैदराबादला येता यावं यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “मी तिला लहानपणापासून ओळखतो, ती अतिशय अभ्यासू मुलगी होती.”