तरुणांना मिळेल जॉब्स
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : सध्या जगभरातले काही देश महागाई आणि आर्थिक मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. साहजिकच या गोष्टींचा परिणाम उद्योगक्षेत्रावरही दिसू लागला आहे. जगातील काही दिग्गज आयटी कंपन्यांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिग्गज टेक कंपनी ट्विटर आणि फेसबुकने मोठ्या प्रमाणात कामगार कपात केल्याने संपूर्ण उद्योगावर परिणाम झाला आहे. एलॉन मस्क यांनी एका झटक्यात ट्विटरमध्ये केलेली कामगार कपात, मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकमधून 11 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणं, यामुळे या कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील कॉर्पोरेट घराणी या पद्धतीनं कधीच कर्मचारी कपात करत नाहीत. यामागे काय कारण आहे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. खरं तर या मागे काही कारणं आहेत. ट्विटर आणि फेसबुकमध्ये नुकतीच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्या या निर्णयामुळे आयटी उद्योग क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. जे कर्मचारी अनेक वर्षांपासून या कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठीदेखील हा झटका आहे. मात्र यामुळे या कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अब्जवधी डॉलर मार्केट कॅप असलेल्या या कंपन्यांवर अशी वेळ का आली, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारतातील उद्योगपती अशा प्रकारचे निर्णय कधीच घेत नाहीत. रिलायन्सचे मुकेश अंबानी असो अथवा व्होडाफोनचे बिर्ला किंवा टाटा ग्रुपच्या कंपन्या असो, या फर्म अशाप्रकारे एकावेळी अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत नाहीत. या कंपन्यांना असा निर्णय घेण्याची वेळ का येत नाहीत, हे जाणून घेऊया.
मेटामधून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा पगार आणि या सुविधासध्याच्या डिजिटल युगात स्पर्धा वाढत असल्याने फेसबुक आणि ट्विटरसारख्या दिग्गजांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही अतिउत्साहात गरजेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली, असं मार्क झुकरबर्ग सांगतात. या पार्श्वभूमीवर रिलायन्स किंवा टाटा ग्रुपसारख्या दिग्गज भारतीय कंपन्यांविषयी बोलायचं तर त्यांचं नफा कमवणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं आणि ते या अनुषंगाने धोरण आखतात. रिलायन्स जिओ हे याबाबतचं सर्वांत मोठं उदाहरण होय. रिलायन्स जिओने जेव्हा मार्केटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट होता की जेव्हा आपण ग्राहकांना फायदा देऊ शकतो तेव्हाच बाजारपेठेत आपण प्रस्थापित होऊ शकतो. यासाठी या कंपनीनं टप्प्याटप्प्यानं मार्केटवर ताबा मिळवण्यास सुरूवात केली. आदित्य बिर्ला ग्रुपच्या व्होडाफोन-आयडिया कंपनीविषयी बोलायचं तर ही कंपनी मोठ्या कर्जाखाली दबली आहे. कंपनी अनेकवेळा बंद करण्याची वेळ आली होती, परंतु, त्यानंतरही कंपनीने 11,000 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी काढण्याचा निर्णय घेतला नाही. कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याऐवजी आदित्य बिर्ला समूहाच्या मालकीची ही कंपनी सतत निधी उभारण्याचं काम करत आहे. टाटा समूहाबाबत बोलायचं तर, मिठापासून ते जहाज बनवणाऱ्या या समूहाचा `हळूहळू चाला, दीर्घकाळ वाटचाल करा` हा यूएसपी आहे. टाटाचा रिटेल क्षेत्रातील प्रवेश हे याचं सर्वांत मोठं उदाहरण होय. या क्षेत्रात पूर्वीपासून अनेक दिग्गज कंपन्या असताना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने धुमधडाक्यात या क्षेत्रात प्रवेश केला. मात्र टाटा आपल्या धोरणानुसार वाटचाल करत राहिली. टाटाने फेसबुक किंवा ट्विटरप्रमाणे एकदम मार्केट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. परदेशी कंपन्यांनी त्यांची ध्येयधोरणं निश्चित केली असतीलच पण त्यांना भारतीय कंपन्यांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.