नवी दिल्ली, 07 जानेवारी: ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा (Alibaba) आणि अँट ग्रुपचे (Ant Group) मालक चिनी उद्योगपती जॅक मा (Jack Ma) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि चीनमधील कम्युनिस्ट सरकारवर जॅक यांनी टीका केली होती. त्यानंतर 2 महिन्यांहून अधिक काळ झाला तरीही ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात पण त्यांचं ट्विटर हँडलवर देखील गेले अनेक दिवस काहीच पोस्ट करण्यात आलेलं नाही. जॅक यांनी काय म्हटलं ज्यामुळे चिनी सरकारला मिरच्या झोंबल्या आणि जॅक सार्वजनिक आयुष्यातून गायबच झाले. शांघायमध्ये जॅक यांनी केलं होतं भाषण ऑक्टोबर 2020 मध्ये शांघायमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जॅक म्हणाले होते, ‘ नव्या संशोधनांच्या अंमलबजावणीसाठी नवे कायदे हवेत जुन्या पद्धतींचा काहीच उपयोग नाही. आपण जसं एखाद्या रेल्वे स्टेशनचं व्यवस्थापन करतो तशाच पद्धतीने आपण विमानतळाचं व्यवस्थापन करू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण भूतकाळात व्यवस्थापन करायचो त्याच पद्धतीने आपण भविष्यातलंही व्यवस्थापन करू शकणार नाही. आर्थिक संदर्भात आपल्याला ‘गहाण ठेवण्याच्या’ मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. आपल्याला क्रेडिट सिस्टिम विकसित करायला हवी आणि त्यावर अवलंबून रहायला हवं. मला असं लक्षात आलंय की ‘गहाण ठेवण्याची’ मानसिकता हा चीनमधला सर्वांत गंभीर प्रश्न आहे. त्याचा फटका अनेक उद्योजकांना बसला आहे. उद्योगपतीला त्यांची सगळी संपत्ती गहाण ठेवावी लागते आणि हा प्रश्न खूपच गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर खूप दडपण असतं.’ (हे वाचा- ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेच्या संसद भवनात हैदोस, गोळीबारात एका महिलेचा मृत्यू ) चिनी बँका म्हणजे पानपट्टया - जॅक ते पुढे म्हणाले, ’ आपल्याला नव्या पिढीसाठी अर्थव्यवस्था तयार करावी लागेल. सध्याची बँकिंग सिस्टिम बदलायला हवी. चिनी बँका उद्योगांत नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांवर दडपण आणतात. चीनमधील बँका या ‘पानपट्टया’ आहेत म्हणजे त्या उद्योजकांना संपत्ती गहाण ठेवायला सांगून कर्ज देतात आणि त्यावरचं व्याज खातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँकिंगचे नियम म्हणजे म्हाताऱ्यांचा क्लबच झाले आहेत.’ याच भाषणात मा यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. सद्यस्थितीत जिनपिंग यांच्यावर टीका करणं हे ईशनिंदेपेक्षा कमी नाही त्यामुळे ती लक्ष्मणरेषा मा यांनी या भाषणात ओलांडली होती. भाषणानंतर फिरले जॅक यांचे ग्रह जॅक यांच्या भाषणानंतर चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी संतापली आणि जॅक आणि त्यांच्या कंपन्यांचे जणू ग्रहच फिरले. सर्वांत पहिल्यांदा अँट ग्रुप या जॅकच्या कंपनीचा 37 अरब डॉलरचा नोव्हेंबर 2020 मध्ये येणारा आयपीओ सस्पेंड करण्यात आला. वॉल स्ट्रीट जरनलच्या वृत्तानुसार आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट जिनपिंग यांनी दिला होता. जॅक यांच्या कंपन्यांवर कडक निर्बंध लादले गेले. चीनमधील सर्वांत मोठ्या सरकारी बँकेनी अँट ग्रुपला नोटीस पाठवली. चीनच्या मार्केट रेग्युलेटरने अलिबाबा कंपनीविरुद्ध एकाधिकारविरोधक तपास सुरू केला. (हे वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांचं FB-Instagram 24 तर ट्विटर अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक ) शेवटच्या ट्वीटमध्ये जॅक म्हणाले होते… जॅक मा यांनी 10 ऑक्टोबर 2020 ला दुपारी 2.36 वाजता शेवटचं ट्वीट केलं होतं. जगातल्या महान व्यक्तिंसोबत एका कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं होतं. त्यांच्या ‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ टीव्ही शोच्या नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या फायनलमध्येही ते सहभागी होणार होते. यांच्याच शोमधून त्यांचाच फोटो काढून टाकण्यात आला. जॅक कामात व्यस्त असल्याने ते या पॅनलमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत अशी माहिती अलिबाबा समूहाच्या वतीने देण्यात आली होती. जॅक यांना एका अज्ञात ठिकाणी नजरकैदेत ठेवलं आहे असं चीनमधील सरकारी वृत्तपत्र पीपल्स डेलीनी म्हटलं आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर जाऊ नये असा सल्ला सरकारने जॅक यांना दिला आहे असंही या वृत्तात म्हटलंय. चीनमध्ये अशी घटना पहिल्यांदा घडत नाही आहे चीन सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना गप्प करण्याचं जॅक मा हे पहिलं प्रकरण नाही. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी किंवा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बोलणाऱ्या अनेकांना चीन सरकारने नजरकैदेत टाकलं आहे. जिनपिंग यांच्यावर टीका करणारे रियल एस्टेट व्यावसायिक रेन झिकियांग बेपत्ता झाले होते. कोरोना महामारीमध्ये योग्य पाऊल न उचलल्याबद्दल रेन यांनी शी जिनपिंग यांना विदूषक म्हटलं होतं. नंतर त्यांना 18 वर्षांचा तुरुंगवास झाला. चीनमधील अरबपती शिआन जिआनहुआ 2017 पासून नजरकैदेत आहेत. आता या यादीत जॅक मा यांचंही नाव येतंय असं वाटतंय. ऑक्टोबर 2020 पासून जानेवारी 2021 पर्यंत जॅक मा यांच्या संपत्तीत 11 अरब डॉलरची घट झाली असून ती आता 50.9 अरब डॉलर झाली आहे.