नवी दिल्ली, 30 जून: अनेकांनी लहान असताना काही ना काही अशा गोष्टी केलेल्या असतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. कारण त्यामुळे होणारा त्रास आयुष्याचा बराच काळ भोगावा लागू शकतो. न्यूझीलंडमधल्या (New Zealand) मेरी मॅकार्थी (Mary McCarthy) नावाच्या एका महिलेच्या बाबतीत असं घडलं आहे. लहानपणी खेळताना तिच्या नाकात प्लास्टिकची एक चकती (Tiddlywink) गेली होती आणि ती तिथेच अडकून पडली होती. तब्बल 37 वर्षांनी कोरोना टेस्ट (Covid Test) करताना त्या चकतीबद्दल कळल्यानंतर ऑपरेशन करून ती काढावी लागली. त्या चकतीमुळे तिला बराच त्रास सहन करावा लागला. टीव्ही 9 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, मेरी मॅकार्थी आठ वर्षांची होती, तेव्हा नाकावर चकती ठेवून जोरात श्वास सोडून ती वर उडवायचा खेळ आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत होती. त्या वेळी अंदाज चुकल्यामुळे श्वास बाहेर टाकण्याऐवजी आत ओढला (Inhaled) गेला आणि त्याबरोबर ती चकतीही नाकात ओढली गेली. असलं काही तरी विचित्र घडल्यावर आई ओरडेल याची भीती प्रत्येक मुलाच्या मनात असतेच. तशीच ती मेरीच्या मनात होती. म्हणून तिने आपल्या आईला याबद्दल काही सांगितलंच नाही. त्यामुळे ती चकती त्या वेळी बाहेर काढलीच गेली नाही. त्यामुळे मेरीला अनेकदा श्वास घ्यायलाही त्रास होत होता, पण त्याकडे तिने दुर्लक्ष केलं. तिने काही तरी नेहमीचीच, साधीशी समस्या असेल, असा विचार केला. त्यामुळे ही समस्या हळूहळू गंभीर रूप धारण करू लागली. त्या चकतीवर कॅल्सिफाइड (Calcified) पदार्थांचं आवरण तयार होऊ लागलं. त्यातून त्रास आतल्या आत अधिक वाढू लागला, पण तो मोठ्या स्वरूपात बाहेर पडला नव्हता. तब्बल 37 वर्षं ती चकती तिच्या नाकात तशीच होती.
मेरी ही एका हॉस्पिटलमध्ये काम करणारी कर्मचारी. कोविड टेस्ट केल्यानंतर तिच्या नाकात अचानक वेदना होऊ लागल्या आणि नाक सतत वाहत राहू लागलं. शेवटी तिने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायचं ठरवलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला क्रॉनिक अर्थात गंभीर स्वरूपाचा सायनस (Chronic Sinus) झाल्याचं निदान केलं. त्यानंतर थोड्याच दिवसांत तिच्या वेदना इतक्या वाढल्या, की हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागलं. तिच्या नाकात आतमध्ये काही तरी अडकलेलं आहे, हे सीटी स्कॅन (CT Scan) केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर ऑपरेशनशिवाय पर्यायच नव्हता. डॉक्टर्सनी ऑपरेशन करून ती चकती बाहेर काढली. त्यानंतर तिच्या वेदना थांबल्या. लहानपणीच्या उपद्व्यापाची आठवण तब्बल 37 वर्षं तिच्या शरीरात होती.