बेपत्ता पाणबुडीची शोधमोहिम युद्धपातळीवर
दिल्ली, 22 जून : जगातील सर्वात प्रसिद्ध जहाजांपैकी एक असलेलं टायटॅनिक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रविवारी पाच व्यक्ती सिफर्ट टायटन नावाच्या पाणबुडीतून अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, ही पाणबुडी आता बेपत्ता झाली आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. कारण, पाणबुडीत अवघे 10 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. हाच ऑक्सिजन पाणबुडीतील व्यक्ती श्वासोच्छवासासाठी वापरत आहेत. बचावकर्त्यांसमोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. बेपत्ता पाणबुडीतील पाच जणांमध्ये ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग, पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा यांचा समावेश आहे. त्यामुळे या घटनेला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं आहे. 10 हजार 432 किलो वजन असलेल्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी बहुराष्ट्रीय ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत, यूएस कोस्ट गार्ड, कॅनडाची लष्करी विमानं, फ्रेंच जहाजं आणि टेलीगाइड रोबो इत्यादी टायटॅनिकच्या अवशेषांकडे जात असताना बेपत्ता झालेल्या पाणबुडीचा शोध घेत आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार, पाणबुडीतील व्यक्तींकडे आता 10 तासांपेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यामुळे बचावकर्ते 24 तास काम करत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत 96 तासांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा होईल, अशी टायटनची रचना करण्यात आलेली आहे. टायटनच्या क्रूकडे मर्यादित रेशन शिल्लक असल्याचं मानलं जात आहे. टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीचा शोध सुरूच; पाण्यातून येतोय आवाज पण.. टायटनचा शोध घेत असलेल्या सोनार क्षमता असलेल्या कॅनेडियन विमानानं बुधवारी एक आवाज टिपला होता. ज्या ठिकाणाहून आवाज ऐकू आला त्या ठिकाणी तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. कॅनेडियन विमानानं टिपलेल्या आवाजामुळे आशा निर्माण झाली आहे की, टायटनमधील प्रवासी अजूनही जिवंत आहेत. मात्र, तज्ज्ञ अद्याप स्रोताची शाहनिशा करू शकलेले नाहीत. “जेव्हा तुम्ही शोध आणि बचाव कार्यात गुंतलेले असता, तेव्हा तुम्हाला नेहमीच आशा बाळगावी लागते, विशेषत: आवाजांच्या संदर्भात. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास विमानानं ऐकलेला आवाज कशाचा आहे, हे आम्हाला माहीत नाही. कधीकधी अशी स्थिती निर्माण होते की कठोर निर्णय घ्यावा लागतो. अद्याप तशी परिस्थिती उद्भवलेली नाही. शोध आणि बचाव मोहीम पूर्ण क्षमतेनं चालवली जात आहे,” अशी माहिती तटरक्षक दलाचे कॅप्टन जेमी फ्रेडरिक यांनी दिली आहे. बेपत्ता पाणबुडीचा शोध घेण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन म्हणजे वेळेशी स्पर्धा सुरू असल्यासारखं आहे. जगभरातील नागरिकांचं या घटनेकडे लक्ष लागलेलं आहे. विस्तीर्ण समुद्रात सुरू असलेल्या बचाव प्रयत्नांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांची टेलिव्हिजनवर माहिती देणार्या सागरी तज्ज्ञांनी नागरिकांना मोहित केलं आहे. तज्ज्ञांनी 2018 मध्ये या पाणबुडीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती. कारण, ‘अमेरिकन ब्यूरो ऑफ शिपिंग’ या पाणबुडींना प्रमाणित करणाऱ्या अग्रगण्य संस्थेला बगल देऊन OceanGate नं टायटन कार्यान्वित केली होती.