नवी दिल्ली, 05 एप्रिल : लेबनॉन (Lebanon) देशाचे उपपंतप्रधान सदेह अल-शमी (Sadeh al-Shami) यांनी आपला देश दिवाळखोर घोषित केला आहे. शमी म्हणाले की, देशासोबतच देशाची मध्यवर्ती बँकही (Central Bank) दिवाळखोरीत निघाली आहे. लेबनीज लिरा (Lebanese Lira) या लेबनॉनचे चलन मूल्यात 90 टक्के घट झाली आहे. युनायटेड नेशन्सचं म्हणणं आहे की, लेबनॉनची 82 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गरीब झाली आहे. या परिस्थितीवर बोलताना शमी यांनी सौदी अरेबियाच्या अल-अरेबिया वाहिनीला सांगितले की, नुकसान भरून काढण्याची जबाबदारी देशाची मध्यवर्ती बँक Banque du Liban, बँका आणि ठेवीदारांची आहे. ते म्हणाले की, कोणाला किती नुकसान भरपाई द्यायची यावर टक्केवारी ठरलेली नाही. लेबनीजचे उपपंतप्रधान म्हणाले, ‘दुर्दैवाने केंद्रीय बँक आणि देश दिवाळखोरीत निघाले आहेत. यावर उपाय शोधायचा आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या धोरणांमुळे हे घडले आहे आणि जर आपण काही केले नाही तर नुकसान खूप मोठे होईल. आलेली परिस्थिती हे एक सत्य आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही परिस्थितीकडे पाठ फिरवू शकत नाही. आम्ही सर्व लोकांना बँकेतून पैसे काढण्याची व्यवस्था करू शकत नाही, हे दुर्दैव असून सामान्य स्थिती असती तर किती बरे झाले असते. लेबनॉन आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. शमी म्हणाले, ‘आम्ही आयएमएफशी चर्चा करत आहोत. आम्ही त्यांच्याशी रोज बोलत आहोत आणि चर्चेतही बरीच प्रगती झाली आहे. लेबनॉन गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. लेबनॉनमधील हे संकट आधुनिक युगातील जगातील सर्वात गंभीर आर्थिक संकटांपैकी एक आहे. हे वाचा - रशियन सैनिकांकडून युक्रेनी तरुणीवर रेप करुन हत्या?खासदाराने शेअर केले भयंकर फोटो हे संकट ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू झाले. देशाच्या या दुर्दशेला सत्ताधारी राजकीय पक्षात पसरलेला भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. लेबनीज सरकारने देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. येथील चलन 90 टक्क्यांनी घसरले आहे. या घसरणीमुळे देशात महागाई प्रचंड वाढली असून लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. लेबनॉनमधील बहुतेक लोक आरोग्य सुविधा आणि शिक्षणापासून वंचित आहेत. वीज, इंधनाअभावी नागरिकांना बहुतांश काळ अंधारात राहावे लागते. लेबनॉन हा आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. आर्थिक संकटामुळे देशाचा परकीय चलनाचा साठाही रिकामा झाला आहे, त्यामुळे परदेशातून माल आयात करणे शक्य होत नाही. देशातील बेरोजगारी 40 टक्क्यांवर पोहोचली आहे. हे वाचा - गाडी पेक्षा टोल महाग! ड्राव्हरच्या खात्यातून कापला 43 लाखांचा टोल कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. 2020 मध्ये, बेरूत बंदरात झालेल्या एका मोठ्या स्फोटामुळे आर्थिक संकट अधिक गंभीर झालं होतं. या स्फोटात 216 लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो लोक जखमी झाले होते. स्फोटामुळे राजधानी बेरूत हादरली आणि त्याचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.