वॉशिंग्टन, 19 एप्रिल : भारतीय वंशाच्या (Indian American) अमेरिकन नौदलातील दिग्गज अधिकारी शांती सेठी या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांच्या कार्यालयात कार्यकारी सचिव आणि संरक्षण सल्लागार म्हणून रुजू झाल्या आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये उपराष्ट्रपतींचे वरिष्ठ सल्लागार हर्बी झिस्केंड यांनी सांगितलं की, शांती सेठी या अमेरिकन नौदलाच्या कमांडर होत्या. संरक्षण सल्लागार या महत्त्वाच्या पदावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गोष्ट शांती सेठी यांनीही सोशल मीडियावर शेअर केली आहे. याचा उल्लेख त्यांच्या लिंक्डइन (Linked in) प्रोफाइलमध्ये करण्यात आला आहे. शांती सेठी यांनी डिसेंबर 2010 ते मे 2012 या कालावधीत ‘यूएसएस डेकॅचर’ या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकाचं नेतृत्व केलं. त्याच वेळी, भारताला भेट देणाऱ्या यूएस नौदलाच्या युद्धनौकेच्या त्या पहिल्या महिला कमांडर होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, त्या 1993 मध्ये नौदलात रुजू झाल्या होत्या. तरीही कायद्यामुळे त्यांची भूमिका फारच मर्यादित होती. यानंतर त्या अधिकारी झाल्यावर हा कायदा काढून टाकण्यात आला. त्यांनी यूएसए टुडेला सांगितलं की, मी अशा करिअरमध्ये आहे, ज्यामध्ये माझ्यासाठी अनेक शक्यता आहेत. मी पुरुषांचं वर्चस्व असलेल्या मैदानात उतरत असताना माझ्यासाठी तिथं बऱ्याच संधी होत्या. हे वाचा - रशिया आणि युक्रेनमधील शांतता करार कठीण का आहे? कोणाला जास्त फटका बसणार? नेवाडा इथं जन्मलेल्या शांती सेठी यांनी यापूर्वी 2021-22 मध्ये नौदल सचिवांचे वरिष्ठ लष्करी सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी नॉर्विच विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. सेठी यांनी मास्टर्स ऑफ इंटरनॅशनल पॉलिसी अँड प्रॅक्टिसमध्ये पदवी प्राप्त केली आहे. शांती सेठीचे वडील 1960 मध्ये भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले. विशेष म्हणजे, कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या राजकारण्यांपैकी आहेत, ज्यांनी आतापर्यंत अमेरिकन राजकारणात उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं आहे.