कीव्ह, 02 मार्च: गेल्या सहा दिवसांपासून रशिया (Russia-Ukraine War) आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाने युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचं दिसत आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधल्या सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. रशिया अधिक आक्रमक होताना दिसत आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या युक्रेनमध्ये सध्या एका गूढ चिन्हाची (Mystery Marks) चर्चा जोरात सुरू आहे. ‘ही चिन्हं तिथं विनाश आणू शकतात’, अशा स्वरूपाचा इशारा सोशल मीडियावर (Social Media) युक्रेनचे नागरिक एकमेकांना देत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हच्या (Kyiv) स्थानिक प्रशासनाने या चिन्हांपासून सावध राहण्याचा इशारा सोशल मीडियावरून नागरिकांना दिला आहे. सध्या कीव्हमधल्या इमारतींच्या छतावर आणि रस्त्यांवर क्रॉसचं एक चिन्ह आढळून येत आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला समर्थन देणाऱ्या देशद्रोह्यांनी (Traitor) या खुणा केल्या आहेत, जेणेकरून रशियन क्षेपणास्त्रं थेट या इमारती आणि मार्गांना लक्ष्य करू शकतील, असं मानलं जात आहे. सध्या असे व्हिडीओ आणि धोक्याचा इशारा देणारे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. ट्विटरवर (Twitter) प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये इमारतीच्या छतावरच्या गॅस पाइपवर लाल क्रॉसचं चिन्ह दिसत आहे. हे वाचा- रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंता वाढली प्रत्येक इमारतीच्या छतावर पाहण्याचं आवाहन ‘उंच इमारतींच्या छतावर अशा खुणा आहेत का हे तपासून पाहावं’, असं आवाहन कीव्ह शहराच्या स्थानिक प्रशासनाने (Local Government) सोशल मीडियावरून नागरिकांना केलं आहे. लाकडावरची अशी चिन्हं एक तर रंगांद्वारे किंवा रिफ्लेक्टिव्ह टेपने तयार केली गेली असावीत, असं दुसऱ्या एका मेसेजमध्ये म्हटलं आहे. ही चिन्हं धुळीनं किंवा कोणत्याही प्रकारे झाकून टाका किंवा पुसून टाका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. हे वाचा- मोठी बातमी! भारतीयांनो आज संध्याकाळी सहापर्यंत खार्कीव्ह सोडा, महत्त्वाची सूचना संशयास्पद चिन्ह दिसल्यास माहिती देण्याचे आदेश एवढंच नाही, तर मुख्य चौक किंवा पायाभूत सुविधांनजीक एक छोटा ट्रान्समीटरही बसवला जाऊ शकतो, असं अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क करताना म्हटलं आहे. कीव्हचे महापौर विटाली क्लिश्को यांनी एका निवेदनात म्हटलं आहे, की `शहराच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे, की त्यांनी लॉ इन्फोर्समेंट एजन्सीला चिन्हांकित लोकेशनविषयी तातडीनं कळवावं. तसंच या कृत्यात ज्या व्यक्ती सहभागी असू शकतात, त्यांच्याविषयी माहिती द्यावी. युक्रेनमध्ये राहून रशियाला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांना 15 ते 20 वर्षं तुरुंगवास भोगावा लागेल.` युक्रेनमध्ये रशियाला पाठिंबा देणारे गटही मोठ्या संख्येने आहेत.