कीव, 27 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine war) आज 32 वा दिवस असून युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. युक्रेनचे सैन्य रशियन सैन्याला कडवी टक्कर देत आहे. काही शहरे रशियाच्या ताब्यापासून मुक्त करण्यातही यश आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खाटीक (Biden called Putin butcher) संबोधत या युद्धात युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. युक्रेनच्या एक लाख लोकांना आश्रय देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर पुतीन काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे 5 मोठे अपडेट्स जाणून घ्या. बायडेन पुतीन यांना म्हणाले खाटीक पोलंड दौऱ्यावर गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खाटीक म्हटले आहे. वॉर्सा येथे युक्रेनच्या निर्वासितांशी भेट घेतल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बायडेन यांनी पुतीन यांच्याबाबत हे वक्तव्य केलं. गेल्या आठवड्यात बायडेन यांनी पुतीन यांना खुनी हुकूमशहा म्हटलं होतं. रशियन आक्रमण अमानुष असल्याचे वर्णन करताना बायडेन म्हणाले की, युक्रेनवरील या संकटात त्याला मदत करणे ही सर्व देशांची जबाबदारी आहे. युक्रेनमधील एक लाख लोकांना अमेरिकेत आश्रय देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. अमेरिकेने युक्रेनला 10 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदतही जाहीर केली आहे. पुतीन यांना राष्ट्रपती होण्याचा अधिकार नाही : बायडेन युक्रेनच्या मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन म्हणाले की, रशियातील सामान्य नागरिकांशी आमचे कोणतेही वैर नाही. मात्र पुतिन यांनी ज्या प्रकारे युक्रेनवर हल्ला केला आहे, त्यानंतर त्यांना रशियात सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. दुसरीकडे, क्रेमलिनने बायडेन यांना प्रत्युत्तर देत म्हटले की, रशियामध्ये कोण सत्तेवर राहील, कोण नाही हे बायडेन ठरवू शकत नाहीत. निर्णय घेण्याचा अधिकार फक्त रशियाच्या नागरिकांना आहे. त्यांनी पुतीन यांना त्यांचे अध्यक्ष म्हणून निवडले आहे. Russia-Ukraine War: रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं झेलेन्स्की यांची नाटोकडे शस्त्रास्त्रांची मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्धच्या युद्धात पाश्चात्य देशांकडून अधिक मदत मागितली आहे. त्यांनी शनिवारी सांगितले की अनेक देशांनी आम्हाला आश्वासन दिले होते की ते आम्हाला त्यांची लष्करी शस्त्रे आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रे पुरवतील, परंतु आम्हाला रणगाडे, लढाऊ विमाने आणि जहाजविरोधी यंत्रणा हवी आहे. जर आपल्याला नाटोची फक्त 1 टक्के विमाने आणि 2 टक्के रणगाडे मिळाले तरी आम्ही दुसरे काहीही मागणार नाही. हे सामान त्यांच्या युद्ध भांडारात धूळखात पडलेलं आहे. पाश्चात्य देशांच्या वृत्तीवर असमाधानी दिसणारे झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही वाट पाहत असताना 31 दिवस उलटले आहेत. तुम्हाला रशियाची भीती वाटते का? ब्रिटनने सांगितले की, रशियाकडून दिलेले निर्बंध हटवणार… युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर लादलेले निर्बंध सशर्त शिथिल करण्याची मागणी ब्रिटनने केली आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस म्हणाले की, जर रशियाने युक्रेनमध्ये पूर्ण युद्धविराम करण्याचे आश्वासन दिले आणि आपले सैन्य मागे घेतले तर आम्ही त्यावर लादलेले निर्बंध संपुष्टात आणू. ब्रिटनने 650 अब्ज डॉलर्सची मालमत्ता असलेल्या रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. याशिवाय बड्या रशियन उद्योगपती आणि त्यांच्या कुटुंबियांची 150 अब्ज पौंडांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धात भारताला सर्वात मोठी संधी! शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी युक्रेनियन सैन्याने अनेक शहरे पुन्हा ताब्यात घेतली युक्रेनचे सैनिक रशियन सैन्याला कडवी टक्कर देत आहेत. त्यामुळे पुतिन यांच्या सैनिकाची प्रगती थांबली आहे. युक्रेनच्या सैनिकांना त्यांची अनेक शहरे रशियन ताब्यापासून मुक्त करण्यात यश आले आहे. त्यांनी युक्रेनच्या ईशान्येकडील ट्रोस्टियानेट्स (Trostianets) शहरातून रशियन सैन्याला हुसकावून लावले आहे. युक्रेनवर आक्रमण करताना रशियाने ताब्यात घेतलेल्या पहिल्या शहरांपैकी हे एक होते. याशिवाय, युक्रेनियन सैन्याने झापोरिझ्झिया ओब्लास्टमधील (Zaporizhzhia Oblast) अनेक गावे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. येथे रशियन सैन्याला अनेक ठिकाणी कडवी टक्कर दिली जात आहे.