कराची 11 जून : जगभरात कोरोना विषाणूनं (Coronavirus) हातपाय पसरले आहेत. या परिस्थितीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी अनेक देशांनी लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला वेग दिला आहे. मात्र, काही देशांमध्ये लसीबाबत नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे, सरकारला वेगवेगळ्या ऑफर, बक्षीस आणि कठोर नियम करुन इथल्या नागरिकांना लस घेण्यास भाग पाडावं लागत आहे. अशीच परिस्थिती पाकिस्तानातही आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये (Punjab) सरकारनं लस न घेणाऱ्या नागरिकांचं सिम कार्डच बंद (Sim Card Block) करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. यासमीन रशीद (Dr. Yasmin Rashid) यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. Ary News नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या निर्णयाचा उद्देश अशा नागरिकांना लस घेण्यास भाग पाडणं आहे, जे आतापर्यंत लस घेण्यास नकार देत होते. आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, की लसीकरणाचा वेग वाढवल्यामुळे राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, पंजाब प्राथमिक आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून असं दिसतं, की राज्य अजूनही लसीकरणाचं निर्धारित लक्ष्य गाठण्यात मागे आहे. राज्यात तीन लाख लोक असे आहेत, जे १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी परतलेच नाहीत. यामुळे, राज्य सरकारनं असा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की प्रशासन त्या लोकांची माहिती घेऊन कॅटेगिरी बनवत आहे, जे दिलेल्या वेळेत दुसरी लस घेण्यासाठी आले नाहीत. अधिकाऱ्यानं म्हटलं, अशीही शक्यता आहे, की त्यातील काही जणांचा दुसरा डोस घेण्याआधीच मृत्यू झाला असेल. काही लोक पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाल्यानं त्यांनी दुसरा डोस घेतला नसावा, असा अंदाज अधिकाऱ्यानं व्यक्त केला. तर, काही लोक लसीबाबत पसरवली जाणारी चुकीची माहिती ऐकून दुसरा डोस घेण्यासाठी आले नसावे, असंही त्यांनी म्हटलं. आजारी वडिलांचं झालं ओझं; उरुळी कांचनमध्ये मद्यपी मुलानं ब्लेडनं चिरला गळा याआधी सिंध राज्य सरकारनंही असा निर्णय घेतला होता, की जे सरकारी कर्मचारी कोरोना लस घेणार नाहीत, त्यांचा पगार दिला जाणार नाही. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 95 लाखाहून अधिक लसीचे डोस दिले गेले आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ 25.4 लाख आहे. देशातील एकूण 21 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी असल्यानं सरकारही चिंतेत आहे.