लंडन, 9 एप्रिल: जगातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या राजघराण्याला धक्का देणारी बातमी लंडनमधून आली आहे. ब्रिटीश राजघराण्यातले (British Royal Family) वयाने सर्वांत ज्येष्ठ सभासद आणि महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांचे पती प्रिन्स फिलीप (Prince Phillip died) यांचं निधन झालं. Duke of Edinburgh म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स फिलीप 99 वर्षांचे होते. बीबीसीने ही बातमी दिली आहे. लंडनमधल्या बकिंगहम पॅलेसने ड्युक ऑफ एडिंबरा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राणी एलिझाबेथ (द्वितीय) म्हणजे तत्कालीन राजकुमारी आणि प्रिन्स फिलीप यांचा 1947 मध्ये विवाह झाला होता. ब्रिटीश राजघराण्यात 70 वर्षं ड्युकपदावर राहिलेले फिलीप हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला ते ब्रिटीश रॉयल नेव्हीत कार्यरत होते. एका सम्राज्ञीबरोबर 70 वर्षांहून अधिक संसार केला आणि त्यासाठीच त्यांना ओळखलं जातं. प्रिन्स फिलीप प्रथमपासून रूढीवादाला फाटा देणारे म्हणून ओळखले गेले. राजघराण्यात असूनदेखील काही प्रथांना त्यांनी उघड विरोध केला होता आणि ब्रिटीश राजवाड्यात आधुनिकता आणली होती. आता पुढचा महिनाभर ब्रिटीश राजघराण्यात दुखवटा पाळला जाईल. त्यानंतरच महाराणी एलिझाबेथ रॉयल ड्युटी सांभाळायला पुन्हा सज्ज होतील. हे वाचा - राष्ट्रपती पदासाठी पुतीन यांचा रस्ता मोकळा; 2036 पर्यंत पदावर राहू शकतात कायम बकिंगहम पॅलेसकडून अधिकृतपणे राणी एलिझाबेथ यांच्या वतीने निधनाविषयी कळवण्यात आलं आहे. प्रिन्स फिलीप काही दिवस जुन्या हृदयरोगाच्या तक्रारीसाठी रुग्णालयात उपचार घेत होते. विंडसर पॅलेस इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1947 मध्ये म्हणजे राजकुमारी एलिझाबेथ महाराणी व्हायच्या अगोदर पाच वर्षं त्यांचा फिलीप यांच्याशी विवाह झाला होता. ब्रिटीश घराणेशाहीच्या इतिहासात महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांचा सर्वाधिक काळ चाललेला शाही संसार होता.