पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये
मुंबई, 22 जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि जील बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत केलं. यावेळी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. पहिल्यांदाच दोन देशांचे प्रमुख भेटत असताना सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. 30 वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो असताना व्हाईट हाऊस बाहेरून बघितलं होतं. आज त्याच व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत होत असल्यानं भारावून गेलो असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली. अमेरिका आणि भारत हे लोकशाही मूल्यांवर आधारित देश आहेत. दोन्ही देशांच्या ‘वी द पीपल’ या तीन शब्दांनी दोन देश बांधले गेलेत असं मोदींनी म्हटलंय. मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. या दौऱ्यामुळे अमेरिका आणि भारतातले संबंध आणखी मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना खास भेटवस्तू दिल्यात. या भेटवस्तूंमधून भारताच्या सांस्कृतिक विविधतेची झलक आहे. मोदींनी लाकडाच्या पेटीत जिल बायडन यांना भेटवस्तू दिल्यात. यात प्रामुख्यानं महाराष्ट्रात तयार केलेला गूळ आहे. ही लाकडी पेटी म्हैसूरच्या चंदनापासून बनवलेली आहे. तर ही पेटी जयपूरमधील कारागिरांनी तयार केली आहे. या पेटीवर ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ लिहिलेलं आहे. राजस्थानमधील हस्तनिर्मित 24K सोन्याचं नाणंही यात आहे. पेटीमध्ये एक गणेशमूर्ती, कोलकात्यामधील चांदीचा दिवा, आणि पश्चिम बंगालमध्ये घडवलेला चांदीचा नारळही आहे. पंजाबमध्ये तयार केलेले तूप, उत्तराखंडमधील लांब दाणा असलेला तांदूळ, तामिळनाडूतले तीळ आणि गुजरातमध्ये तयार केलेले मीठ या भेटवस्तू बायडन दाम्पत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहेत.