JOIN US
मराठी बातम्या / विदेश / वर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू

वर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू

साधारणतः (Coronavirus) कोरोनाचा संसर्ग 14 दिवसांत बरा होतो; पण ब्रिटनच्या एका व्यक्तीचा 14 महिने या विषाणूशी लढा सुरू होता. Long Covid ची सर्वात जुनी केस म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 19 जून : जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना (Coronavirus) संसर्गाने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहायला मिळत आहेत. कोरोना विषाणूत वारंवार होणारी म्युटेशन्स, त्यामुळे तयार होणारे नवे व्हॅरिएंट, या व्हॅरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याने लक्षणांमध्ये होणारे बदल आणि कोविडमधून बरं झाल्यानंतर रुग्णांना जाणवणाऱ्या विविध समस्यांचा यात समावेश आहे. याच अनुषंगाने एक वेगळीच घटना कोरोनाशी सातत्याने लढा देत असलेल्या ब्रिटनमध्ये (Britain) घडली. साधारणतः कोरोनाचा संसर्ग 14 दिवसांत बरा होतो; पण तिथल्या एका व्यक्तीला तब्बल 14 महिने कोरोनाचा संसर्ग राहिला. या व्यक्तीने अखेर 14 महिन्यांनी कोरोनाशी (Fight Against Corona) लढाईत हार मानली. ‘ टीव्ही 9 ’च्या वृत्तानुसार, जेसन कल्क (Jason Kelk) असं या दीर्घ कोरोनामुळे (Long covid) मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून, त्यांना मार्च 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. 49 वर्षीय जेसन यांचं शुक्रवारी (18 जून) निधन झाले. मागील वर्षी 31 मार्चपासून ते लीड्स इथल्या सेंट जेम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची 63 वर्षांची पत्नी सू कल्क (Sue Kelk) यांनी ‘दीर्घ काळ कोरोनाविरोधात लढा देऊनही ते अपयशी ठरले,’ अशी प्रतिक्रिया दिली. ब्रिटनमधील दीर्घकाळ कोरोनाबाधित राहिलेल्या रुग्णांपैकी जेसन हे एक होते. सू कल्क यांनी फेसबुकवरून आपल्या पतीच्या निधनाचं वृत्त सर्वप्रथम शेअर केले. 31 मार्चला केले रुग्णालयात भरती लीड्स येथील सीक्रॉफ्ट येथे वास्तव्यास असणारे प्राथमिक शाळेतील आयटी वर्कर जेसन केल्क टाइप टू डायबेटीस (Type 2 Diabetes) आणि अस्थमाने (Asthma) पीडित होते. 28 मार्चला त्यांना तीव्र खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना अँटिबायोटिक्स देण्यात आली. परंतु, त्यांची प्रकृती सातत्याने खालावली होती. 31 मार्चला त्यांच्या पत्नीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्या वेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल (Oxygen level) खूप कमी होती. रुग्णालयात भरती केल्यानंतर ते लवकरच ठीक होऊन घरी परततील असं रुग्णालयाने सांगितलं. परंतु, तसं घडलं नाही, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. हे ही वाचा: मुलाच्या मृत्यूनंतर सरकारनं दिलेले 10लाख घेऊन सून फरार, वृद्ध दाम्पत्य वाऱ्यावर कोरोनामुळे फुफ्फुसं, किडनीवर प्रतिकूल परिणाम 3 एप्रिलला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. कोरोना संसर्गामुळे त्यांची फुफ्फुसं आणि किडनीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना सातत्याने व्हेंटिलेटर आणि डायलिसिसवर अवलंबून राहावं लागत असे. तसंच द्रवपदार्थ घेता येण्यासाठी जेसन यांच्या घशात एक नळी बसवण्यात आली होती. ‘तुमचे पती हे अशा लोकांपैकी एक आहेत, की जे दीर्घ काळ कोरोनाशी सामना करीत आहेत,’ असं काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सू कल्क यांना सांगितलं होतं. यावर, ‘कोरोनाशी दीर्घकालीन लढा हा चमत्कारापेक्षा वेगळा नाही. हे त्यांच्या इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. ते आपल्या घरी परतू इच्छितात, आपल्या परिवारासोबत राहू इच्छितात हे यावरून दिसतं,’ अशी प्रतिक्रिया सू कल्क यांनी दिली; पण अखेर त्यांनी उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. ‘ आय न्यूज डॉट यूके ’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ‘तो माझा सोलमेट होता, आम्ही दोघं एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू होतो, पण एकमेकांत खोलवर गुंतलेलो होतो. जेसन यांचं धैर्य खूप मोठं होतं. प्रकृती खालावण्यापूर्वी ते चहा घेऊ लागले होते, सूपदेखील घेत होते, तसंच दररोज फेसबुक मेसेंजरचाही वापर करत होते,’ असं स्काय न्यूजशी बोलताना सू यांनी स्पष्ट केलं. जेसन यांच्या घरी परतण्याबाबत आम्ही नियोजन केलं होते. तसेच मदतीकरिता क्राउडफंडिंगदेखील (Crowd Funding) सुरू केलं होतं, अशा आठवणींना त्यांच्या पत्नीने उजाळा दिला आहे. आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराकरिता निधीसाठी सू यांनी GoFundMe हे पेज सुरू केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या