लॉस एंजेलिस, 14 मार्च: पैशांच्या लोभापोटी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. विम्याच्या पैशांसाठी (Insurance Money) एका व्यक्तीनं आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेमधील लॉस एंजेल्समध्ये राहणाऱ्या एका पित्याने विम्याचे (insurance) पैसे हडपण्यासाठी आपल्या मुलांची हत्या केली. त्याने त्याच्या आधीच्या पत्नीची देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने ती वाचली. या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अली. एफ. एल्मेझायन (वय 45, Ali F. Elmezayen) असं या आरोपी पित्याचं नाव आहे. मुलांच्या हत्येच्या जवळपास पाच वर्षांनंतर अलीला शिक्षा मिळाली आहे. या प्रकरणी सुनावणी करताना अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीला 212 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असेल की एका व्यक्तीला त्याच्या वयाच्या कित्येक पटींनी जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. अलीने 2015मध्ये आपली मुलं आणि आधीच्या पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. तो 9 एप्रिल 2015 ला आपली मुलं आणि पत्नीला पोर्ट ऑफ लॉस एंजेलिस मधील सॅन पेड्रो या बंदरावर घेऊन गेला. या ठिकाणी अलीने आपली मुलं आणि पत्नीसह कार पाण्यामध्ये नेली. कार पाण्यात गेल्यानंतर तो कारचा दरवाजा उघडून बाहेर आला. त्याच्या पत्नीला पोहता येत नव्हते पण बंदरावर असलेल्या मच्छिमारांनी तिचे प्राण वाचवले. पण अलीच्या 8 आणि 13 वर्षांच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अलीला तिसरा मुलगा आहे पण त्यावेळी तो त्यांच्यासोबत नव्हता. (हे वाचा- लग्नानंतरही गरोदर राहात नव्हती तरुणी; 25 वर्षींनी समजलं, की ती महिला नसून पुरुष ) सरकारी वकिलांनी सांगितलं की, ‘अलीनं जुलै 2012 आणि मार्च 2013 च्यामध्ये आठ विमा कंपन्यांकडून (insurance companies) स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबासाठी 30 लाख डॉलर्सपेक्षा जास्त (जवळपास 21 कोटी रुपये) किंमतीचा जीवन आणि अपघाती मृत्युचा विमा खरेदी केला होता. यादरम्यान अली विमा कंपनीना सतत कॉल करुन त्याच्या पत्नी आणि मुलांचा अपघाती मृत्यू झाला तर पैसे मिळतील का? अशी विचारणा करत होता. विमा पॉलिसी संपण्याच्या 12 दिवसआधी अलीने विम्याचे पैसे हडपण्यासाठी आपल्या मुलांची हत्या केली.’ अलीने पैसे हडपण्यासाठी केलेल्या या घाणेरड्या कृत्याची कहाणी ऐकल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. ‘अली खूपच खोटारडा आणि लबाड आहे. तसंच तो लोभ आणि क्रूर खुनी आहे’, असं सांगत अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जोहर आर वॉल्टर (U.S. District Judge John R. Walter) यांनी त्याला 212 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. महत्वाचे म्हणजे, अलीला त्याने केलेल्या कृत्याबद्दल अजिबात दु:ख नाही. त्याला फक्त एकाच गोष्टीचं दु:ख आहे ते म्हणजे तो पकडला गेला. (हे वाचा- हद्दच झाली! बापालाही हवी स्लिम ट्रिम लेक; मरेपर्यंत फिट राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट ) सरकारी वकिलांनी पुढं सांगितलं की, ‘मुलांच्या मृत्यूनंतर विमा पॉलिसीच्या माध्यमातून अलीला 2,60,000 डॉलर्स मिळाले. त्याने ते पैसे काढून घेतले. यातील काही पैशांचा वापर करुन त्याने इजिप्तमध्ये रिअल इस्टेट आणि एक बोट खरेदी केली.’ दरम्यान, न्यायाधीशांनी अलीला विमा कंपन्यांना नुकसान भरपाई म्हणून 2,61,751 डॉलर्स देण्याचे आदेश दिले आहेत.