नवी दिल्ली, 18 जून : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (kim jong un) यांनी कबूल केले आहे की आपला देश गंभीर खाद्यपदार्थांच्या संकटातून जात आहे. सीएनएनच्या अहवालानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत किमने कबूल केले की, परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे उत्तर कोरियामध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. अन्नपदार्थ खरेदी करणं सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. राजधानी प्योंगयांगमध्ये काळ्या चहाच्या (Black Tea) छोट्या पाकिटाची किंमत 70 डॉलर (सुमारे 5,167 रुपये) आहे, एका कॉफी पॅकची किंमत 100 डॉलर (7,381 रुपये) आहे आणि एक किलो केळीची किंमत 45 डॉलर आहे (सुमारे 3300 रुपये). नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) म्हटले आहे की, उत्तर कोरियामध्ये 860,000 टन धान्य कमतरता आहे. यावरून अंदाज घेतल्यास देशात केवळ दोन महिन्यांचा धान्यपुरवठा शिल्लक असल्याची भयाणक स्थिती आहे. रेडिओ फ्री एशियातील एका अहवालात असा दावा केला आहे की, उत्तर कोरियन शेतकऱ्यांना खत निर्मितीसाठी दररोज 2 लिटर मूत्र देण्यास सांगितले गेले आहे. चिंताजनक परिस्थिती असूनही किम यांनी म्हटले आहे की, देशाच्या सीमारेषा बंदच राहतील आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले नियम कायमच राहतील. उत्तर कोरियाने कोरोना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र, लोकांची उपासमार होऊ लागली आहे. हे वाचा - Explainer: यंदा जून महिन्यातच अनेक ठिकाणी Red Alert; महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप? उत्तर कोरिया आयातीसाठी आणि जनतेला कसेबसे पोसण्यासाठी चीनकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहे. कारण देशात निर्माण होणारे स्वतःचे उत्पादन पुरेसे नाही. उत्तर कोरियावर आण्विक कार्यक्रमांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय बंदी घालण्यात आल्या आहेत. यावर्षी एप्रिलमध्ये किमने येणाऱ्या संकटाची कबुली देत अधिकाऱ्यांना “आरडूअस मार्च” साठी तयार राहण्यास सांगितले.‘आरडूअस मार्च’ चा उपयोग नॉर्थ कोरिया मध्ये 1994 ते 1998 च्या दरम्यान खाद्य संकटावेळी केला गेला होता.