JOIN US
मराठी बातम्या / विदेश / सिंगापूरमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार भारतीय वंशाची व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत थरमन षण्मुगरत्नम?

सिंगापूरमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार भारतीय वंशाची व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत थरमन षण्मुगरत्नम?

संसदीय कामकाजाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी षणमुगरत्नम यांचा सत्कार केला आणि दोन दशकांहून अधिक काळ सार्वजनिक सेवेतील त्यांच्या योगदानाची स्तुती केली.

जाहिरात

थरमन षणमुगरत्नम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंगापूर: सिंगापूरमधील भारतीय वंशाचे ज्येष्ठ मंत्री थरमन षणमुगरत्नम तिथली राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी सर्व अधिकृत आणि राजकीय पदांचा राजीनामा दिला आहे. संसदीय कामकाजाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी षणमुगरत्नम यांचा सत्कार केला आणि दोन दशकांहून अधिक काळ सार्वजनिक सेवेतील त्यांच्या योगदानाची स्तुती केली. 66 वर्षांचे थरमन षणमुगरत्नम हे सिंगापूर सरकारमध्ये सामाजिक धोरणांचे समन्वयक मंत्री होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ते शुक्रवारी पीपल्स अॅक्शन पार्टीचा राजीनामा देणार आहेत. मंत्री म्हणून गुरुवारी त्यांनी संसदेतील शेवटची बैठक घेतली. सभागृह नेत्या इंद्राणी राजा म्हणाल्या, “आम्हाला या सभागृहात एस. एम. थरमन यांची आठवण येईल. त्यांची उपस्थिती प्रभावी तर होतीच, पण त्यांची भाषणंही अभ्यासपूर्ण होती. एस.एम. यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते गुंतागुंतीची आर्थिक तत्त्वे अगदी सोप्या पद्धतीने मांडायचे. त्याची बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वाची आम्हाला आठवण येईल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, एक मित्र आणि सहकारी खासदार म्हणून आम्हाला त्यांची उणीव भासेल.” ‘स्ट्रेट्स टाईम्स’नं गुरुवारी याबाबत वृत्त दिलं होतं.

रशियात सत्तापालटाची शक्यता; वॅगनर सैनिकांचं बंड, पुतीन अडचणीत

थरमन यांनी 2001 मध्ये संसद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी आत्तापर्यंत उपपंतप्रधान तसेच शिक्षण आणि अर्थ मंत्री यांच्यासह अनेक कॅबिनेट पदे भूषवली आहेत. सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सार्वभौम संपत्ती निधी असलेल्या जीआयसीचे उपाध्यक्षपद, गुंतवणूक धोरण समितीचे अध्यक्षपद आणि आर्थिक विकास मंडळाच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे.

सिंगापूरमध्ये दर सहा वर्षांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होतात. विद्यमान राष्ट्रपती हलिमा याकूब यांचा कार्यकाळ 13 सप्टेंबरला संपणार आहे. त्या पूर्वीच देशातील राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरमध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना कठोर अटी व शर्ती लागू होतात. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार नामांकनाच्या दिवशी 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असला पाहिजे. ती व्यक्ती सिंगापूरची नागरिक असणं आवश्यक आहे किंवा त्या व्यक्तीनं नामांकनाच्या तारखेपर्यंत किमान 10 वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्य केलेलं असावं. नामांकनाच्या दिवशी ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसणं अपेक्षित आहे.

AI म्हणजे अमेरिका इंडिया; PM मोदींचे वक्तव्य आवडले, बायडेन यांनी दिलं खास गिफ्ट

थरमन यांचा जन्म सिंगापूरमध्येच झाला आहे. एका अँग्लो-चायनीज शाळेतून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीसारख्या जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण घेतलेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या