JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Lockdown पेक्षा जेल बरा! इतके हाल झाले की फरार कैदीही 29 वर्षांनी स्वत:च पुन्हा तुरुंगात गेला

Lockdown पेक्षा जेल बरा! इतके हाल झाले की फरार कैदीही 29 वर्षांनी स्वत:च पुन्हा तुरुंगात गेला

बेकारीला कंटाळून एका फरार कैद्याने (Escaped Prisoner) चक्क 30 वर्षांननंतर तुरुंगातून पळाल्याचा गुन्हा कबूल करत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची अजब घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus Pandemic) रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनचा (Lockdown) कठोर उपाय अवलंबला गेला. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) तर सर्वात प्रदीर्घ काळ लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले असून अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. बेकारीला कंटाळून एका फरार कैद्याने (Escaped Prisoner) चक्क 30 वर्षांननंतर तुरुंगातून पळाल्याचा गुन्हा कबूल करत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची अजब घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी (Sydney)इथे डार्को देसिक (Darko Desik) नावाच्या एका 64 वर्षीय गृहस्थाने सप्टेंबर महिन्याच्या मध्याला डी व्हाय उपनगरातील पोलीस ठाण्यात जाऊन आपण 30 वर्षांपूर्वी तुरुंग फोडून पळालो होतो, असं सांगत आपला गुन्हा कबूल करून आत्मसमर्पण केलं. 30 वर्षे सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या, पोलिसांपासून सहीसलामत राहिलेल्या डार्कोनं आपला गुन्हा कबूल करण्यामागचं एकमेव कारण होतं ते म्हणजे लॉकडाउन. या लॉकडाउनमुळे तो बेरोजगार (Jobless) आणि बेघरही (Homeless) झाला होता. ऑस्ट्रेलियात राहत असताना 1992 मध्ये मॅरिज्युएना या अंमली पदार्थाची पैदास केल्याबद्दल त्याला अटक झाली होती आणि त्या गुन्ह्यात झालेली 33 महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी ग्रॅफ्टन तुरुंगात (Grafton Prison) झाली होती. तिथे शिक्षेचे 14 महिने राहिलेले असताना त्याने हॅक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने कोठडीच्या खिडकीच्या लोखंडी पट्ट्या कापून तुरुंगातून पलायन केलं होतं.

एका पालीची दहशत! भीतीने काम सोडून पळाले कर्मचारी; अख्खं ऑफिस रिकामं झालं

त्यानंतर सुमारे 30 वर्षे तो सिडनीच्या नॉर्दर्न बीच उपनगरात वास्तव्य करत होता. मूळचा युगोस्लाव्हियाचा (Yogoslavia) असलेल्या डार्को देसिकला भीती होती की आपली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा युगोस्लाव्हियाला पाठवलं जाईल. 1991ते 1995 च्या दरम्यान, युगोस्लाव्हियात विभाजनासाठी यादवी सुरू होती, आपल्याला तिथं परत पाठवलं तर सैन्यात सेवा करावी लागेल या भीतीनं डार्को देसिक तुरुंगातून पळाला होता. अखेर 30 वर्षांनी परिस्थितीनं त्याला पुन्हा तुरुंगात जाण्यास भाग पाडलं. गुरुवारी सिडनीच्या सेंट्रल लोकल कोर्टात मॅजिस्ट्रेट जेनिफर ऍटकिन्सन यांच्यासमोर त्याच्या खटल्याची सुनावणी झाली तेव्हा त्यांनी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगत त्याच्या तेव्हाच्या राहिलेल्या शिक्षेत आणखी दोन महिन्यांची भर घातली. अशा गुन्ह्यांसाठी संभाव्य जास्तीत-जास्त 10 वर्षांची शिक्षा आहे.

देशाविषयी अपशब्द उच्चारत सोशल मीडियावर VIDEO केला पोस्ट;अटकेनंतर अशी झाली अवस्था

बचाव पक्षाचे वकील पॉल मॅकगिर यांनी पत्रकारांना सांगितलं की डेसिकला अलीकडेच ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सकडून एक पत्र मिळालं होतं, ज्यात तुरुंगातून सोडल्यानंतर त्याला हद्दपार केलं जाईल, असं म्हटलं होतं. मात्र आता तो देश अस्तित्वातच नाही हे लक्षात घेऊन याबाबत योग्य कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डार्कोने अन्य कोणतेही गुन्हे केलेले नाहीत मात्र तो ऑस्ट्रेलियन नागरिक (Australin Citizen) नसल्याने त्याला कोणत्या देशात पाठवलं जाऊ शकतं हे स्पष्ट नाही, असंही त्यांनी सांगितलं. कोरोना संसर्गामुळे डेसिकला सिडनीतील 26 जून ते 11 ऑक्‍टोबरपर्यंत झालेल्या लॉकडाउनने बेरोजगार आणि बेघर केलं. त्यामुळे त्याला तुरुंगाचा मार्ग स्वीकारावा लागला. मात्र त्याच्या सुटकेसाठी स्थानिक जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली असून, त्याच्या अटकेपासून त्याचा कायदेशीर खर्च बिले आणि घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक निधी (Crowd Funding) उभारण्यात येत असून त्याद्वारे 30,000 ऑस्ट्रेलियन डॉलर जमा करण्यात आल्याचंही मॅकगिर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या