नवी दिल्ली, 9 एप्रिल : सर्वसामान्यांसाठी अंतराळ (Space) हा औत्सुक्याचा विषय असतो. अंतराळ सफर ही सर्वसामान्यांसाठी अशक्यप्राय गोष्ट असली, तरी जीवनात एकदा तरी अशी संधी मिळावी, असं स्वप्न प्रत्येकाने पाहिलेलं असतं. अलीकडच्या काळात अनेक श्रीमंत उद्योगपती अंतराळ सफरीमुळे (Space Travel) चर्चेत आहेत. त्यात एलॉन मस्क (Elon Musk) याचं नाव अग्रणी आहे. एलॉन मस्क यांची स्पेस एक्स (SpaceX) ही कंपनी, Axiom आणि यूएस स्पेस एजन्सी नासा (NASA) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (International Space Station) जाणारी पहिली खासगी मोहीम अर्थात प्रायव्हेट मिशन (Private Mission) रवाना झाली आहे. स्पेस स्टेशनला भेट देण्यासाठी आणि या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी तीन श्रीमंत उद्योगपतींनी 417 कोटी रुपयांची तिकिटं खरेदी केली आहेत. `एशियानेट न्यूज`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या एका रॉकेटने शुक्रवारी (8 एप्रिल) अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं पहिलं खासगी मिशन नुकतंच लॉंच झालं आहे. अंतराळ सफारीच्या व्यापारीकरणातला हा एक मैलाचा दगड ठरला आहे. विशेष म्हणजे `आयएसएस`ला भेट देण्यासाठी तीन श्रीमंत उद्योगपतींनी प्रतिव्यक्ती 417 कोटी रुपये दराने तिकिटं खरेदी केली आहेत. अब्जाधीश एलॉन मस्क यांनी 2022 मध्ये स्पेस एक्स रॉकेट कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचं मुख्यालय अमेरिकेतल्या (America) लॉस एंजलीसमध्ये आहे. अंतराळ स्थानकावर खासगी मिशन पाठवण्यासाठी Axiom,स्पेस एक्स आणि नासा यांच्यात करार झाला आहे. अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी अमेरिका, कॅनडा (Canada) आणि इस्रायलच्या (Israel) प्रत्येकी एका व्यक्तीनं तिकीट खरेदी केलं. या व्यक्ती रिअल इस्टेट, गुंतवणूक आणि अन्य कंपन्या चालवतात. त्यांनी रॉकेट सफारी आणि राहण्याकरिता 55 दशलक्ष अमेरिकी डॉलर खर्च केले असून, त्यात जेवणाचा खर्च समाविष्ट आहे. अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी डेटनचे लॅरी कॉनर (कॉनर ग्रुप), मॉन्ट्रियलच्या मॅव्हरिक कॉर्पचे संस्थापक आणि सीईओ मार्क पॅथी आणि इस्राइलचे एयटन स्टिबे (माजी फायटर पायलट आणि व्हायटल कॅपिटलचे संस्थापक भागीदार) या तीन श्रीमंत व्यक्तींनी तिकिटं खरेदी केली आहेत. हे ही वाचा- गरजू लोकांना विनामूल्य राहता यावं, म्हणून ‘या’ व्यक्तीनं खरेदी केलं एक कोटीचं घर ही ऐतिहासिक पदार्पणाची स्पेसफ्लाइट आणि ऑर्बिटल सायन्स मिशनसाठी ह्यूस्टन इथल्या Axiom Space Inc. या स्टार्टअपने निवडलेल्या चार सदस्यांच्या टीमला सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी केप कॅनवेरल, फ्लोरिडा इथल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून (Kennedy Space Center) अवकाशात पाठवण्यात आलं. या चार जणांनी स्पेस एक्सच्या `फाल्कन 9` रॉकेटमधून उड्डाण केलं. या चार जणांच्या टीममध्ये एक माजी अंतराळवीर आणि लॅरी कॉनर, मार्क पॅथी तसेच एयटन स्टिबे या तीन ग्राहकांचा समावेश आहे. हा प्रवास एकूण 10 दिवसांचा आहे. सर्व काही नियोजनानुसार झालं, तर नासाचे निवृत्त अंतराळवीर मायकेल लोपेझ-अलेग्रिया यांच्या नेतृत्वाखाली या व्यक्ती 20 तासांहून अधिक प्रवास केल्यानंतर शनिवारी (9 एप्रिल) अंतराळ स्थानकावर पोहोचतील. हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचावरच्या कक्षेत स्थित आहे आणि ते पृथ्वीभोवती फिरत आहे.