‘वर्क्र फ्रॉम होम’ करताना वेबकॅम सुरू न ठेवल्याने कारवाई करणाऱ्या कंपनीला न्यायालयाचा दणका, वाचा डिटेल्स
मुंबई, 12 ऑक्टोबर: कोविड-19 महामारीपासून जगभरात ‘वर्क्र फ्रॉम होम’चे कल्चर मोठ्या प्रमाणात रुळले आहे. जगभरातील कोट्यवधी कर्मचारी आपल्या घरात बसून काम करत आहेत. काही कर्मचारी तर मायदेशात राहून परदेशातील कंपन्यांसाठी काम करत आहेत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क्र फ्रॉम होम’ची सवलत दिली असली तरी त्यासोबत काही नियम आणि अटीही लागू केल्या आहेत. त्यांचे पालन न केल्यास कारवाई होते. अशीच एक घटना नेदरलँड्समधील कर्मचाऱ्यासोबत घडली. मात्र, हे प्रकरण कारवाई करणाऱ्या कंपनीच्या अंगलट आलं आहे. फॉर्च्युन मासिकानं दिलेल्या वृत्तानुसार, एका डच न्यायालयानं अमेरिकन कंपनीला आपल्या बडतर्फ कर्मचाऱ्याला 72 हजार 700 डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा स्थित शातो (Chateau) या एका टेलिमार्केटिंग कंपनीच्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांचा वेबकॅम सुरू ठेवून रोज काम करावं लागत होतं. मात्र, या कर्मचाऱ्यानं ‘वर्क फ्रॉम होम’ दरम्यान दिवसाचे 9 तास वेबकॅम चालू ठेवण्यास नकार दिला होता. न्यायालयानं अमेरिकन कंपनीबाबत निर्णय देताना म्हटलं आहे की, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेबकॅम सुरू ठेवण्यास भाग पाडणं म्हणजे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करणं आहे. निकाल देताना कोर्टानं म्हटलं, “फ्लोरिडास्थित शातो कंपनीला नेदरलँड्समधील कर्मचाऱ्याला वेब कॅम सुरू ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी 72 हजार 700 डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागेल.” युरोपियन मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांच्या संरक्षणाचा हवाला देत न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. “कामाच्या ठिकाणी कर्मचार्याचं कोणत्याही प्रकारे व्हिडिओ निरीक्षण करणं हे त्याच्या खासगी जीवनात अवास्तव हस्तक्षेप मानला जाईल,” असंही न्यायालयानं म्हटलं आहे. हेही वाचा: पोटात दुखत होतं म्हणून तो डॉक्टरकडे आला… पण ऍक्सरेमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला कंपनीच्या कर्मचाऱ्यानं सांगितलं की, त्याला वेबकॅम सुरू ठेवणं खूप अस्वस्थ वाटत होतं. व्हर्च्युअल ट्रेनिंग प्रोग्रॅमदरम्यान कोणीतरी वेबकॅमद्वारे आपल्याला मॉनिटर करत असल्याची भावना निर्माण झाली. मॉनिटरिंग दरम्यान, कर्मचाऱ्याला फक्त त्याचा कॅमेरा सुरू ठेवून लॅपटॉपची स्क्रीनही शेअर करावी लागत होती. कर्मचाऱ्यानं वेबकॅम सुरू ठेवण्यास नकार दिल्याने ‘अवज्ञा’ आणि ‘काम करण्यास नकार’ अशी कारणं देऊन त्याला ताबडतोब कामावरून काढून टाकलं. ही कारवाई चुकीची वाटल्यानं कर्मचाऱ्यानं न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान, Digital.com नं आपल्या सर्वेक्षणात सांगितलं आहे की, जवळपास 60 टक्के कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचार्यांची प्रॉडक्टिव्हिटी आणि वर्क अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटरिंग सॉफ्टवेअर वापरतात. 53 टक्के कर्मचारी कार्यालयीन कामाव्यतिरिक्त इतर कामांमध्ये दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात, असंही या सर्वेक्षणात समोर आलं आहे.