नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : कॅनडामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅनडातील राम मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘मोदींना दहशतवादी घोषित करा’ याचबरोबर हिंदुस्थान मुर्दाबाद असे लिहण्यात आले आहे. ही बाब समोर आल्यानंतर भारताकडून असे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण कॅनडातील मिसिसॉगा भागात घडले आहे.
राम मंदिराच्या भिंतीवर लिहिलेल्या घोषणांचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर टोरंटो येथील भारतीय दूतावासाने याचा निषेध केला आहे. दूतावासाने कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे या घटनेची चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दूतावासाने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मिसिसॉगा येथील राम मंदिराची विटंबना आणि तेथे भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा तीव्र निषेध करतो. दोषींवर त्वरित कारवाई करण्याची आमची मागणी आहे.
हे ही वाचा : बदला अभी बाकी! पुलवामा हल्ल्यातील 19 गुन्हेगार, 8 ठार, 7 तुरुंगात, उर्वरित कुठे आहेत फरार?
भारताच्या वाणिज्य दूतावासाने याप्रकरणी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “आम्ही मिसिसोंगामधील राम मंदिराची तोडफोड करणे आणि मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिणाऱ्यांचा निषेध करतो. आम्ही कॅनडा सरकारकडे या प्रकरणाचा तपास करण्याची आणि आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जानेवारीमध्ये कॅनेडातल्या ब्राम्प्टन येथील हिंदू मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. त्यानंतर तिथल्या स्थानिक हिंदू रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसेच भारताच्या वाणिज्य दूतावासाने याप्रकरणी नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, “ब्राम्प्टन येथील गौरी शंकर मंदिराच्या विद्रुपीकरणामुळे कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर भारतीय दूतावासाने कॅनडा सरकारसमोर या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा : श्रद्धा वालकर खूनातील आरोपी आफताफला घ्यायचंय उच्च शिक्षण; कोर्टाकडे केली मोठी…
ब्राम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला होती. पॅट्रिक ब्राऊन म्हणाले होते की, अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या शहरात आणि देशात स्थान नाही. तसेच महापौर ब्राऊन यांनी शहर पोलीस प्रमुखांशी चर्चा करून या घटनेची चौकशी केली होती.