न्यूयॉर्क, 12 एप्रिल : अमेरिकेमधील न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशनवर (Brooklyn subway shooting) अनेक लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. ब्रुकलिनमधील सनसेट पार्कमधील (Brooklyn sunset park) 36th स्ट्रीट स्टेशनवर ही घटना घडली. या घटनेचा पहिला व्हिडिओ ग्राऊंड झीरोवरून समोर आला आहे. घटनास्थळावरील स्थिती यामध्ये दिसत आहे.
या घटनेनंतर अमेरिकेत दहशतवादी हल्ला (Terrorist attack in America) झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेकांचा जीव धोक्यात सापडला आहे.
संबंधित घटनेत आतापर्यंत 13 जणांना गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे गॅसचे मास्क परिधान करुन आले होते. पोलिसांना घटनास्थळी अनेक बॉम्ब मिळाले आहेत. त्यांना निकामी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी मेट्रो स्थानकावर धूर देखील मोठ्या प्रमाणात होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कुणालाही अटक केलेली नाही. पण आतापर्यंत जो तपास करण्यात आलाय त्यामध्ये गोळीबार करणारे आरोपी हे मेट्रो स्टेशनवर कन्स्ट्रक्शनचं काम करणाऱ्या कामगारांचे कपडे परिधान करुन आलेले होते. तसेच त्यांनी गॅस मास्कही परीधान केलेलं होतं. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासत आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, हा अतिरेकी हल्ला आहे की दुसरं काही षडयंत्र, याबाबत अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.