नवी दिल्ली, 26 मार्च : उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइलचं (Intercontinental Ballistic Missile) यशस्वी परीक्षण केल्याची बातमी समोर येत आहे. त्या वेळी उत्तर कोरियाचे सुप्रीम लिडर किम जोंग उन वेगळ्याच रुबाबात असल्याचं पाहायला मिळालं. उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याच्या वृत्ताला उत्तर कोरियाच्या माध्यमांनी दुजोरा दिला आहे. या क्षेपणास्त्र चाचणीदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात किम जोंग उन एकदम ‘फिल्मी स्टाइल’मध्ये दिसत आहेत. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उत्तर कोरियाने लॉन्च केलेलं हे मिसाइल कोणत्याही देशाने रोड मोबाइल लाँचरवरून सोडलेलं आतापर्यंतचं सर्वांत मोठे द्रव-इंधनयुक्त मिसाइल (Liquid-Fueled Missiles) आहे. या मिसाइलचं नाव Hwasong-17 असं आहे. किम जोंग यांनी या परीक्षणाचं वर्णन आपल्या अणुशक्तीचं प्रदर्शन असं केलं. अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई होऊ नये यासाठी ही तयारी करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचं या वर्षातलं हे 12 वं प्रक्षेपण होतं. उत्तर कोरियाने केलेल्या या मिसाइल परीक्षणावर अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने टीका केली आहे. हे ही वाचा- Russia Ukraine War: रशियानं Instagram आणि Facebook वर घातली बंदी, सांगितलं हे कारण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये किम जोंग उन मिसाइल लॉंचचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. उत्तर कोरियातल्या माध्यमांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. मिसाइल लॉन्चदरम्यान किम जोंग उन यांनी लेदरचं ब्लॅक जॅकेट, ब्लॅक पॅन्ट आणि सनग्लासेस परिधान करून सिक्युरिटी गार्ड्सच्या ताफ्यासोबत एंट्री घेतली.
त्यांची ही एन्ट्री एखाद्या चित्रपटातल्या हिरोपेक्षा कमी नव्हती. किम जोंग उन आल्यानंतर अनेक जण टाळ्या वाजवताना आणि त्यांचं स्वागत करताना दिसले. यानंतर ते मिसाइल टेस्टसाठी इशारा करतात आणि मग मिसाइल लॉन्च केलं जातं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युझर्सच्या यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. काही युझर्सनी हा व्हिडीओ एडिटेड असल्याचं म्हटलं आहे. काही युझर्सना किम जोंग उन यांची फिल्मी स्टाइल भावली. त्यावर अनेक मीम्सही शेअर करण्यात आले आहेत.