सिडनी, 14 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठात शिकणारा एक भारतीय विद्यार्थी वांशिक हिंसाचाराचा बळी ठरला आहे. त्याच्यावर तब्बल 11 वेळा चाकूने वार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. शुभम गर्ग असे या 28 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पीएचडीचा विद्यार्थी आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात गंभीर उपचार सुरू आहेत. त्याचे आई-वडिल आग्रा येथे राहतात. हा “वांशिक” हल्ला असल्याचे त्याच्या पालकांनी म्हटले आहे. तसेच ते गेल्या सात दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापपर्यंत ते मिळवू शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. तर टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, शुभमने आयआयटी मद्रासमधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ सायन्स पदवी पूर्ण केली आणि यानंतर तो 1 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला गेला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर अनेक जखमा आहेत. तर या गुन्ह्याच्या संदर्भात 27 वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शुभमचे वडील रामनिवास गर्ग यांनी सांगितले की, शुभमच्या ऑस्ट्रेलियातील मित्रांनी पुष्टी केली की ते किंवा शुभम दोघांनाही हल्लेखोर ओळखत नव्हते. हा वांशिक हल्ला असल्याचे दिसून येत आहे. आम्ही भारत सरकारला मदतीची विनंती करतो, असेही ते म्हणाले. तर, आग्रा जिल्हा अधिकारी नवनीत सिंह चहल यांनी सांगितले की, शुभमच्या भावाच्या व्हिसासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत आहोत. मी सिडनी येथील दूतावासाच्या अधिकाऱ्यांशीही बोललो आहे. व्हिसा लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले. हेही वाचा - Nobel Prizes : सर्वांत प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांवरून का होतोय वाद? मिळालेल्या माहितीनुसार, शुभम 6 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराचे भाडे भरण्यासाठी एटीएममधून 800 डॉलर्स काढून खोलीत जात होता. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या जबडा, पोटासह शरीराच्या अनेक ठिकाणी 11 वार झाले होते. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.