नवी दिल्ली, 8 जुलै: सध्याच्या काळात जगातील अनेक देशांसमोर तेलाच्या वाढत्या किमतींची मोठी समस्या आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर अनेक देशात तेलाच्या किमती (Price Of Petrol Diesel) वाढल्या आहेत. अनेक देशात पेट्रोल-डिझेलशिवाय गॅसवरही गाडी चालवली जाते. याचदरम्यान इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावर (Petrol Pump Viral Video) लाखो किड्यांनी कब्जा केल्याचं दिसत असून या व्हिडीओने अनेक लोक हैराण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ मिशिगन येथील आहे. इथे एका पेट्रोल पंपावर लाखो किड्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे इथे कोणी गॅसही घेऊ शकत नाहीये. या पेट्रोल पंपावर गॅस, पेट्रोलही आहे. हे किडे कोणालाही पेट्रोल पंपाजवळ येऊ देत नसल्याची परिस्थिती आहे. संपूर्ण पंपावर त्यांनी आपला कब्जा केला आहे. जर कोणी पंपावर पेट्रोल घेण्यासाठी गेलं, तर त्या व्यक्तीवर किडे अटॅक करत आहेत.
टिकटॉकवर (TikTok) 4 जुलै रोजी या पेट्रोल पंपाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये किड्यांनी कशाप्रकारे पंपवर आपला कब्जा केला आहे, ते पाहण्यात आलं. तिथे पाय ठेवण्याइतकीही जागा उरलेली नाही. एक व्यक्ती आपल्या मुलासोबत त्या पंपावर गेला होता, त्याच्यावर किड्यांनी हल्ला केला. लहान मुलाच्या संपूर्ण हातापायावरही किडे बसले. संपूर्ण पंपावर फक्त त्यांचाच वावर असल्याचं व्हिडीओमध्ये पाहण्यात आलं.
अनेकांनी या व्हिडीओवर कमेंटही केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात किडे कसे आले? या पंपावर कोणी कसं जाऊ शकेल? असे अनेक प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 50 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. भारतात टिकटॉक बॅन असल्याने या किड्यांचे काही फोटो शेअर केले जात आहेत.