JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी; कारण विचारलं तर म्हणतो...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी; कारण विचारलं तर म्हणतो...

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचं वृत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नॉर्थ कॅरोलिना, 12 फेब्रुवारी: जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष (President of USA) म्हणून शपथ घेऊन अजून एक महिनाही झालेला नाही. त्यांची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या एका युवकाला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. नॉर्थ कॅरोलिनामधल्या (North Carolina) गस्टोनिया इथला रहिवासी असलेल्या या 27 वर्षीय युवकाचं नाव आहे डेव्हिड काइल रीव्हज्. ‘सीएनएन’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. राष्ट्राध्यक्षांसह अन्य उच्चपदस्थांना जिवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपावरून डेव्हिडला पोलिसांनी पाच फेब्रुवारीला अटक केली. गुरुवारी (11 फेब्रुवारी) आरोपीला शार्लट इथल्या फेडरल कोर्टात (Federal Court) हजर करण्यात आलं. 28 जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत डेव्हिडने व्हाइट हाउसमध्ये (White House) सतत फोन करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह अनेकांना ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप वकिलांनी केला आहे. आरोपीविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे, की एका कॉलमध्ये डेव्हिडने, तो सर्वांना ठार करणार असून, सर्वांची डोकी उडवणार आहे, अशा शब्दांत धमकी दिली होती. डेव्हिडने सिक्रेट सर्व्हिस एजंटलाही वारंवार फोन करून त्याला, तसंच राष्ट्राध्यक्षांना आणि अन्य उच्चपदस्थांना ठार करण्याची धमकी दिली. तक्रारीसोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातल्या माहितीनुसार, ‘मला भाषणस्वातंत्र्य आहे आणि मी काहीही चुकीचं केलेलं नाही,’ असं डेव्हिडने सिक्रेट सर्व्हिस एजंटला फोनवरून सांगितलं.

 हे देखील वाचा -    वेगाचा बादशाह जेव्हा क्रिकेट खेळतो! उसेन बोल्टचा हा VIDEO पाहिलात का?

संबंधित बातम्या

डेव्हिडला कोठडीतच ठेवण्याचे आदेश फेडरल कोर्टाने गुरुवारी दिले. डेव्हिडला मेक्लेन्बर्ग काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. ‘डेव्हिड यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून, त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी सुरू आहे,’ अशी माहिती आरोपीचे वकील केव्हिन टेट यांनी ई-मेलद्वारे सीएनएनला दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मारण्याची धमकी देण्याचा आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि अडीच लाख डॉलरचा दंड एवढ्या शिक्षेची तरतूद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या