अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल तालिबानला शुभेच्छा देताना अल कायदानं काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे.
काबूल, 09 सप्टेंबर: अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने कब्जा मिळवल्यानंतर आपल्याला हिंसा नको आहे असं त्यांनी सांगितलं असलं, तरी तिथे मूलभूत मानवाधिकारांचंही (Basic Human Rights) उल्लंघन होणार हे अपेक्षितच होतं. त्यानुसार एकेक घटना आता पाहायला मिळत आहेत. महिलांना बंधनं पाळावी लागत आहेत. अनेक महिलांवर अत्याचार झाले आहेत किंवा त्यांच्या हत्या झाल्या आहेत. आता तालिबानने काही पत्रकारांना (Taliban beaten journalists) अटक करून त्यांना निर्दयतेने मारहाण केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. लॉस एंजलीस टाइम्सचे पत्रकार आणि फोटोजर्नालिस्ट मरकस याम (Marcus Yam) यांनी तालिबानकडून प्रचंड मारहाण झालेल्या दोन पत्रकारांचा फोटो काढून तो ट्विटरवर शेअर केला आहे. याम यांच्या माहितीनुसार हे इटिलाट्रोज (Etilaatroz) या अफगाणी माध्यमाचे पत्रकार असून, नेमत नकदी आणि ताकी दरयाबी अशी त्यांची नावं आहेत. #JournalismIsNotACrime (पत्रकारिता हा गुन्हा नाही) असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. याम यांनी काढलेल्या फोटोत दोन्ही पत्रकार पाठमोरे उभे असून, त्यांना मारहाणीमुळे झालेल्या जखमा आणि वळ त्या फोटोत दिसत आहेत. मारहाणीमुळे त्यांचं शरीर अक्षरशः लालेलाल झालेलं दिसत आहे. हे वेदनादायी असल्याचं याम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्तान करत असलेला हस्तक्षेप उघड होत आहे. खासकरून पंजशीर प्रांतातल्या कारवाईवेळी तर हे दिसून आलं आहे. त्याविरोधात काबूलमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या दूतावासासमोर मंगळवारी (7 सप्टेंबर) निदर्शनं करण्यात आली. ही निदर्शनं आणि रॅली रोखण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि या निदर्शनांचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना अटक केली. त्यात या दोन पत्रकारांचा समावेश होता.
अटक केलेल्या पत्रकारांना सोडून देण्याची मागणी करणाऱ्या अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. काही पत्रकारांना सोडून देण्यात आलं असून, त्यातल्या एका पत्रकाराने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर आपला अनुभव असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितला. हेही वाचा- आनंदाची बातमी! नाकाद्वारे देणाऱ्या नेजल व्हॅक्सिनची लवकरच क्लिनिकल ट्रायल ‘अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पत्रकारिता करणं कठीण होत चाललं आहे. तालिबान्यांनी (Taliban) मला जमिनीवर नाक घासायला आणि निदर्शनं कव्हर केल्याबद्दल माफी मागण्यास भाग पाडलं,’ असं त्या पत्रकाराने सांगितलं. दरम्यान, टोलो न्यूज चॅनेलचे कॅमेरामन वाहिद अहमदी यांचाही अटक करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये समावेश असल्याचं या चॅनेलने स्पष्ट केलं.
भारतीय फोटोजर्नालिस्ट दानिश सिद्दिकी यांची तालिबान्यांनी काही महिन्यांपूर्वीच हत्या केली होती. तसंच, एका पत्रकाराला पकडण्यासाठी तालिबान्यांनी घरोघरी जाऊन त्याचा शोध घेतला. त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला ठार केलं, तर बाकीच्या व्यक्तींना गंभीररीत्या जखमी केलं, अशी माहिती डॉयचे वेलेकडून देण्यात आली. दरम्यान, मरकस याम यांनी टिपलेला पत्रकारांचा फोटो न्यूयॉर्क टाइम्सचे अफगाणिस्तान प्रतिनिधी शरीफ हसन यांनीही ट्विट केला आहे.