Viral Video मधला हा अद्भुत धबधबा आहे आपल्या महाराष्ट्रातला! नाणेघाटाबद्दल या गोष्टी माहीत नसतील
मुंबई : सह्याद्रीच्या पोटात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं दडलेली आहेत. उंच डोंगर, खोल दऱ्या, नागमोडी वळणं घेत वाहणाऱ्या नद्या, उंचावरून कोसळणारे धबधबे, घनदाट जंगल, वन्य प्राण्यांचा मुक्त संचार इत्यादी गोष्टींमुळं सह्याद्री जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असंच एक ठिकाण अर्थात नाणेघाट (Naneghat). सध्या नाणेघाटातील अद्भुत निसर्गाची अनुभूती देणारा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Naneghat waterfall) होतोय. हिरव्यागार वनराईनं नटलेल्या उंचच उंच डोगरावरून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्याची दिशाच वाऱ्याच्या दाबामुळं बदलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. धबधब्यातील पाणी सुरुवातीला खालच्या दिशेने कोसळतंय, परंतु पुढच्याच क्षणी वारा त्याला पुन्हा वरती नेतोय. थोडक्यात हा उलटा धबधबा असल्याचा भास व्हावा. नाणेघाट रिव्हर्स धबधब्यामागचं शास्त्रीय कारण- एखादी वस्तू उंचीवर फेकली असता ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते. धबधबा देखील गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करतो. परंतु नाणेघाट धबधब्याचं पाणी खाली पडण्याऐवजी वर येतं. नानाघाटातील धबधब्याचं पाणीही खाली पडतं, परंतु खालून येणाऱ्या वाऱ्याचा दाब हा प्रचंड जास्त असतो. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं नानेघाटातील धबधब्याचं पाणी पुन्हा वर येतं. नाणेघाटातील हा सुंदर व्हिडीओ पाहून तुम्हाला नाणेघाट पाहण्यासाठी जायची इच्छा तर नक्की झाली असेल. पण तिथं कसं जायचं, कुठं थांबायचं, काय पाहायचं हे प्रश्नदेखील पडले असतील. चला तर मग आज जाणून घेऊय़ा नाणेघाटाबद्दल महत्त्वाची माहिती- नाणेघाटावर कसं जायचं? नाणेघाटाची निर्मिती सातवाहन काळात झाली. नाणेघाट कल्याण आणि जुन्नर दरम्यान वसलेला आहे. पुण्यापासून उत्तरेस 120 किलोमीटर अंतरावर नाणेघाट स्थित आहे. उत्कृष्ट रस्त्यांमुळं तुम्ही येथे अगदी आरामात पोहोचू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बाईक किंवा कारमधून येथे येऊ शकता. याशिवाय सार्वजनिक वाहतूकीची साधनंही तुम्हाला येथे पोहोचण्यास मदत करू शकतात. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याणला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण 2 तास लागतात पुण्यामार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येतं. नाणेघाटापासून पुणे आंतरराष्ट्रीय विमान116 किमी अंतरावर आहे. तर आकुर्डी रेल्वे स्टेशन 111 किमी अंतरावर आहे. घाटकर (मोरोशी) हे जवळचं बसस्टॉप असून तेथे मर्यादित बससेवा उपलब्ध आहेत. या मॅप वरून समजेल धबधब्याचं नेमकं लोकेशन.
नाणेघाटात गेल्यावर काय पाहाल?
नाणेघाट निसर्गसंपदेनं संपन्न आहे. येथे जाणारा पर्यटक कधीच निराश होऊन परतणार नाही. ट्रेकप्रेमींसाठीही (Naneghat trekking) नाणेघाट उत्तम ठिकाण आहे. परंतु पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करणं कठीण होतं. येथे ट्रेकिंगसाठी साधारणपणे 3 ते 4 तासांचा कालावधी लागतो. नाणेघाट परिसरातील पुलू सोनाळे या गावाजवळून कणिकेर नावाची नदी वाहते. याच परिसरात लेण्यांचा एक समुह आहे. नाणेघाटाच्या माथ्यावर शिंगरु नावाचे एक पठार आहे. त्यावर अनेक जुनी टाकी व खोदीव रांजण आहेत. या रांजणांना जकातीचे रांजण म्हटले जाते.येथील गणेशस्थळ या ठिकाणीही खोदीव रांजण पहावयास मिळतात. जवळच 150 फुट उंचीचा एक तुटलेला कडा आहे. त्याला नानाचा अंगठा असं म्हणतात. हेही वाचा: Indian Railways: हॉटेलने सर्व्हिस चार्ज घेणं बेकायदेशीर, तर मग ट्रेनमधल्या जेवणावर का द्यायचा जादा चार्ज? ट्रेनमधलं खाणं स्वस्त होणार का? नाणेघाटाच्या माथ्यावरून कळसूबाई शिखरापासून भिमाशंकरपर्यंतच्या परिसर दृष्टीक्षेपात येतो. याशिवाय उत्तरेस हरिश्चंद्रगड, दक्षिणेस ढाक किल्ला, वायव्येस माहुली किल्ला, नैऋत्येस सिद्धगड व मलंगगड, पश्चिमेस उत्तर कोकण, पुर्वेस कुकडनेरचे पठार व जिवधन तसेच हडसर हे किल्ले दृष्टिपथात येतात. नाणेघाटास प्राचीन काळी महत्त्व असल्याने परिसरात अनेक सातवाहन काळातील लेण्या आहेत. मात्र आता या लेण्याची पडझड झाली आहे. यातील एका लेण्याच्या विस्तीर्ण दालनात सातवाहनांचे देवकुल आहे व याच दालनात नागनिका या सातवाहन साम्राज्ञीचा शिलालेख आहे. नाणेघाट परिसरातील महत्त्वाची पर्यटन स्थळं- नाणेघाटाजवळच माळशेजघाट, भैरवगड, माणिकडोह धरण, गिरीजात्मक मंदिर, भीमाशंकर मंदिर, शिवनेरी किल्ला इत्यादी महत्त्वाची भेट देण्याजोगी ठिकाणं आहेत.
हेही वाचा: Monsoon Tips: पावसाळ्यात ट्रॅफिकच्या किचाटातून मिळू शकते सुटका, फक्त करा ‘हे’ छोटं काम
कुठं राहायचं?-
तसं पाहिलं तर नाणेघाटाच्या परिसरात राहण्यासाठी जास्त प्रमाणात हॉटेल्स उपलब्ध नाहीत. परंतु येथून जवळ असलेल्या जुन्नर येथे तुम्हाला राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स मिळू शकतील. याशिवाय MTDC रिसॉर्ट माळशेज घाटात उपलब्ध आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट काळ- पावसाळ्यामध्ये नाणेघाटाचं सौंदर्य आणखी खुलतं.हिरवागार परिसर, पाऊस, फेसाळणारे धबधबे, धुक्याची झालर इत्यादीमुळं पावसाळा नाणेघाटाला भेट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान येथे सुंदर दृश्यांची अनुभूती घेता येते. याशिवाय वर्षभर पर्यटक येथील निसर्गाची मजा घेऊ शकतात.