नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : महानगरात अतिमहत्त्वाच्या कामाने पटकन एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तेव्हा बस, रिक्षाची प्रतीक्षा करण्याऐवजी बहुतांश जण ओला किंवा उबर टॅक्सी सेवेला (Ola & Uber Service) प्राधान्य देतात. कुठल्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत ही सेवा थोडी महागडी पडत असली तरी उत्तम सेवा मिळते म्हणून थोडी अधिकची आर्थिक झळ प्रवासी सोसण्यासाठी तयार असतात. परंतु, उत्तर प्रदेशातील नोएडा (Noida) येथील व्यक्तीला चक्क 45 किमीच्या प्रवासासाठी 3,000 रुपये म्हणजे दुपटीहून अधिक भाडं आकारण्यात आलं. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सी सेवा (Cab Service) मोठ्या शहरात काम करत असल्याचं सांगितलं जातं. पण अनेकांना या सेवांचा वाईट अनुभव येतो. अगदी सुरूवातीच्या काळात उबर आणि ओला या कंपन्यांकडून वाजवी भाडं आकारलं जातं होतं. पण नंतर मात्र दिल्या जाणाऱ्या सेवांवर सरचार्ज लावला जात आहे.
वातावरण बिघाडाचं कारण देत ग्राहकांकडून अधिक प्रवासभाडं घेणं योग्य की अयोग्य? यावरही बरेच दिवसांपासून चर्चा होत आहे. प्रवास केल्यानंतर अॅपवर दाखवली जाणारी रक्कम ग्राहकांना देणं क्रमप्राप्त असतं. नुकतंच मुंबईत वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू असताना एका व्यक्तीने उबर टॅक्सी बुक केली. त्याला 50 किमी प्रवासासाठी तब्बल 3,000 रुपये द्यावे लागले. पण वातावरण निरभ्र असतानाही नोएडातील प्रवाशाला 3,000 रुपये आकारल्याने त्या प्रवाशाने ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
नोएडातील रहिवासी देब यांनी 5 ऑगस्ट 22 रोजी दिल्ली विमानतळ (टर्मिनल 2) येथून नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर त्याच्या घरी जाण्यासाठी उबर टॅक्सी बुक केली. त्या दिवशी वातावरणही निरभ्र होतं. त्यामुळे सरचार्ज लावण्याचा काही प्रश्नच नव्हता. परंतु तरीही त्या प्रवाशाला 147.39 किलोमीटरचे 2,935 रुपये भाडं टॅक्सीच्या मीटरवर दाखवलं गेलं. वास्तविक पाहता नोएडा सेक्टर 143 ते विमानतळापर्यंतचे अंतर फक्त 45 किमी असताना त्यांना तिप्पट अंतर दाखवलं गेलं व पैसे उकळण्यात आले.
पाठपुरावा करूनही 10 दिवस समस्या सुटली नाही
अधिक प्रवास भाडं घेतल्याने देब यांनी 5 ऑगस्टला कस्टमर केअरकडे (Customer Care) तक्रार केली. यावर उबरची तज्ज्ञांची टीम काम करत होती. समस्येचं निराकारण करण्यासाठी काही वेळ लागत असल्याचं सांगण्यात आलं. 10 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतरही देब यांचा उबरशी काही संपर्क झाला नाही.
दरम्यान, देब यांच्याप्रमाणे उबर सेवेचा वाईट अनुभव आल्याची पोस्ट एका दुसऱ्या युजरने पोस्ट केली. त्यात त्यानं म्हटलं की, टी-3 ते नोएडा हा प्रवास करताना जवळपास 3 ते साडेतीन हजार भाडं आकारलं गेलं. टॅक्सी बुक करताना अंदाजे भाडे 1500 दाखवलं गेलं होतं. त्यामुळे आपण अतिरिक्त भाडे परत मिळण्यासाठी मागणी केल्याचे त्या युजरचे म्हणणं होतं. दुसऱ्या एका युजरने उबर टॅक्सीपेक्षा विमानप्रवास स्वस्त असल्याचा खोचक टोमणा हाणला.
ट्विट करत ग्राहकाकडून तक्रार
टॅक्सी प्रवासभाडं अधिक आकारलं गेल्याने देब यांनी ट्विट करत याची तक्रार केली. यात ते म्हणाले की, ‘वाईट सार्वजनिक सेवेचा मी तिरस्कार करतो. पण @Uber_India तुम्ही माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. 5 ऑगस्टला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 2 ते नोएडा येथे घरी जाण्यासाठी 2,935 रुपये भाडं आकारलं. माझ्याकडून 147.39 किलोमीटर अंतराचं भाडं घेतलं गेलं. वास्तविक अंतर तर 45 किलोमीटर आणि एका तासात पार करण्याइतकंच होतं.’
उबरने बुकिंग करताना 1,143 रुपये भाडं लागेल असं दाखवलं होतं. पिक-अप आणि ड्रापचे स्थळही चुकीचं होतं. त्यामुळे ही चूक सुधारून अतिरिक्त रक्कम परत करावी व तक्रार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचं देब यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं.
नितीन