नववर्षात फिरण्याचा प्लॅन करताय?
नवी दिल्ली, 27 डिसेंबर : चीनमध्ये कोरोना ने कहर केला आहे. भारतातही सरकार आता अलर्ट मोडवर आहे. चीनमधील परिस्थिती पाहता कोरोनाची भीती आपल्याकडेही वाढू लागली आहे. लोकांमध्ये नवीन वर्षाचा उत्साह आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. तसेच, तुम्ही कोठे जात आहात यासाठी जारी केलेल्या गाइडलाईन्स जाणून घेऊन तुम्ही त्यांचे पालन केले पाहिजे. कारण, आता प्रत्येक राज्याने निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकसाठी गाइडलाईन्स नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. येथे रेस्टॉरंट, पब, थिएटर हॉल, शाळा, महाविद्यालये अशा बंद ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. येथे नवीन वर्षाचं सेलिब्रेशनसाठी रात्री 1 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. “घाबरण्याची गरज नाही, पण आतापासूनच सावध राहायला हवे”, असे कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या गाइडलाईन्सनुसार, गर्भवती महिला, मुले, वृद्ध नागरिक आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. याशिवाय, जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये असेही म्हटले आहे की, जे काही कार्यक्रम घरामध्ये आयोजित केले जात आहेत, तिथे लोकांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त असू नये. वाचा - ‘ही फक्त सुरुवात! कोरोनाची नवी लाट जगभरात कहर करणार आणि लाखो लोकांचा..’, शास्त्रज्ञांचा दावा दिल्लीतील जनतेने लक्ष द्या.. देशाच्या राजधानीत दिल्ली सरकार कोरोनाबाबत खूप सक्रिय दिसत आहे. सोमवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोविडच्या परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोविडबाबतच्या तयारीचाही आढावा घेतला. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोविडच्या परिस्थितीवर तातडीची बैठक घेतली होती. यादरम्यान, ते म्हणाले होते की दिल्ली सरकार कोणत्याही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. गोव्यात काय परिस्थिती? गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठी गर्दी जमते. हे पाहता राज्य सरकारने येथे कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. राज्यात कोरोनाशी संबंधित कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असा निर्णय सरकारने घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर घोषणा केली की 1 जानेवारी 2023 पर्यंत राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. वास्तविक, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, कोविडशी संबंधित कोणतेही निर्बंध आवश्यक आहेत की नाही हे राज्य सरकार ठरवेल. वाचा - शेवटी नको तेच झालं! चीनमधून परतलेला तरुण कोविड पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाची तयारी सुरू हिमाचलमध्येही मार्गदर्शक तत्त्वे जारी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लाखो पर्यटक हिमाचलमध्ये जातात. गर्दी लक्षात घेता, राज्य सरकारने कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लोकांना मास्क घालण्यास आणि सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. यासोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांनाही लोकांनी या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्येही पूर्ण तयारी उत्तराखंड हे पर्यटनस्थळही आहे. येथेही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, कोरोनामुळे हॉटेल बुकिंगवर परिणाम झाला आहे. येथेही मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सीएमओलाही सर्व रुग्णालयांमध्ये बसवलेले ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, ऑक्सिजन सिलिंडरची योग्य प्रकारे तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.