JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / Bullet Buddhas हा बाईक रायडर्स क्लब नावाप्रमाणेच आहे खास! बायकापोरंही असतात सहभागी

Bullet Buddhas हा बाईक रायडर्स क्लब नावाप्रमाणेच आहे खास! बायकापोरंही असतात सहभागी

बुलेट बुद्धा हा बाईक रायडर्स क्लब आम्ही फक्त दुचाकीस्वारांची संख्या वाढवायला काढला नाही. हा क्लब सुरू करण्यामागे आमची संकल्पाना वेगळी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आम्हाला पहिल्यांदा भेटणारा प्रत्येकजण पहिला प्रश्न हाच विचारतो… बाईक रायडर्सच्या क्लबला ‘बुलेट बुद्धा’ हे नाव का दिलंय? कारण, बाईक रायडर्स म्हणजे वेग, उर्जा, उत्साह, स्टंट, साहस या सर्व गोष्टी आपोआप येतात. तुम्ही नेटवर सर्च केलं तरी या दोघांचा संबंध तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आमच्या सोशल मीडिया पेजवरही तुम्हाला याची माहिती मिळणार नाही. पण हा, तुम्ही ‘बुलेट बुद्धा’ क्लबची गोष्टी वाचली तर याचा अर्थ तुम्हाला नक्कीच मिळेल. आमच्या क्लबमधील कोणालाही विचारलं तरी हिच गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळणार. माझं नाव लजीत, मूळचा केरळचा असलो तरी माझं बरचसं शिक्षण कर्नाटकातील बँगलोरमध्ये झालं आहे. कॉलेजकाळापासूनच आम्हाला बुलेटचं भारी आकर्षण होतं. कुणाच्या उभ्या असलेल्या बुलेटला हात लावायला मिळालं तरी भारी वाटयचं. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. Adventure On Wheel | भूतानच्या सीमेवर रात्रीच्या वेळी तरुणांसाठी जोडपं झालं ‘देवदूत’! वाचा Bikers भावांची फिल्मी स्टोरी बुलेटप्रेमींचा केरळमधील पहिला नोंदणीकृत बुलेट क्लब पुढे नोकरी लागल्यानंतर आमच्या काही मित्रांनी ज्यांनी नंतर बुलेट घेतली. त्यांनी क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2007 मध्ये केरळमधील पहिला नोंदणीकृत क्लब आम्ही स्थापन केला. त्यावेळी आपल्या क्लबला काय नाव द्यायचं यावरुन बराच वादविवाद झाला. सर्वांगीण चर्चेनंतर ‘बुलेट बुद्धा’ नावावर शिकामोर्तब करण्यात आलं. रिकी बोई, अखिल के साबू आणि टॉम्सी अब्राहम हे या क्लबचे संस्थापक सदस्य आहेत. सध्या 55 रायडर्स (35 नोंदणीकृत सदस्य आणि 20 रायडर्स सदस्य होण्यासाठी रांगेत) आहेत. क्लबचा एक कडक नियम आहे की यात फक्त बुलेट मालकांनाच प्रवेश दिला जातो. या ग्रुपचे सदस्य होणं म्हणजे परीक्षाच.. बुलेटप्रेमी किंवा दुचाकी प्रेमींचे भारतात अनेक ग्रुप आहेत. आमच्या क्लबनंतर केरळमध्येही अनेक ग्रुप स्थापन झाले. अनेक क्लबची सदस्य संख्या पाचशे ते हजारपर्यंत पाहायला मिळते. मात्र, 2007 ला स्थापन होऊनही 2022 पर्यंत आमची सदस्य संख्या फक्त 35 असल्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. मुळात आम्ही क्लब स्थापण करण्यामागे ग्रुपची संख्या वाढवणे, नाव कमावणे हा उद्देशच ठेवला नाही. हा क्लब म्हणजे एक कुटुंब आहे. जसे आपल्या कुटुंबात एखाद्या नवीन व्यक्तीला आपण लगेच सहभागी करुन घेत नाही. त्याचप्रमाणे आमचही आहे. कोणत्याही व्यक्तीला आमच्या कुटुंबात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही त्यांच्यासाठी काही कार्यक्रम चालवतो. यात वेगवेगळ्या स्वरुपाचे ट्रेनिंग कोर्स चालवले जातात. छोट्यामोठ्या राईड घेतो. किमान पाच ते सहा महिने हा कार्यक्रम चालतो. त्यानंतर पुन्हा एकदा क्लबमधील सदस्य चर्चा करुन नवीन व्यक्तीला सदस्य करायचे की नाही हे ठरवतात. 3 इडिएट्सचं थेट हिमालयालाच चॅलेंज! वाचतानाही शहारे आणणारा बुलेट प्रवास! याला आम्ही ब्रदरहूड म्हणतो. आमचा प्रत्येक सहकारी एकमेकांची खूप काळजी घेतो. राईडींगला जाताना एक मागे एक पुढे असं कधीही होत नाही. वर्षभरात एक मोठी राईड आणि इतर छोट्यामोठ्या प्रवासाचं आम्ही नियोजन करतो. पण, त्यावेळी सर्व सोबत असतात. आमच्यापैकी एखाद्याने कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला तर त्याचा संपूर्ण सपोर्टींग स्टाफ आम्हीच असतो. त्यामुळे या कुटुंबात कुठल्याही प्रकारे वितुष्ट येऊ नये, म्हणून आम्ही नवीन सदस्य घेण्याआधी ही काळजी घेतो. एकंदरीत आम्ही सर्व जबाबदार रायडर्सचे या क्लबचा भाग होण्यासाठी स्वागत करतो. पण, प्रसिद्धी आणि नावासाठी लोकांनी आमच्यात सामील व्हावे असे आम्हाला वाटत नाही! बाईक चालवणे म्हणजे फक्त मुठ आवळणे नाही.. बाईक रायडर्स म्हणजे वाकडी तिकडी वेगाने गाडी चालवणे, मोठ्याने हॉर्न, सायलेन्सरचा आवाज करणे, स्टंटबाजी करणे असाच सर्वसामान्य समज पसरलेला आहे. हाच समज दूर करण्यासाठी आम्ही काम करतो. रस्त्यावर बाईक चालवणे म्हणजे मोठी जबाबदारी आहे. देशभरात मृत्यू होणाऱ्यांमध्ये अपघाताने जाण्याचं प्रमाण मोठं आहे. यातील अनेक अपघात हे बेजबाबदार वाहन चालवल्याने होतात. यात निष्पाप लोकांचाही बळी जातो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जबाबदार रायडर्स तयार होणे ही काळाची गरज आहे. आमच्या क्लबमध्ये सहभागी झालेल्या नवीन सहकाऱ्यांना आम्ही आधी हेच शिकवतो. बाईक चालवताना प्रत्येकाचा आदर करा. मग तो पादचारी असो किंवा एखादं वाहन. आमचा क्लब सेफ राइडिंगवर विश्वास ठेवतो. अद्यापपर्यंत आमच्यापैकी कोणाचाही अपघात झाला नाही. Adventure on wheels | बुलेटला थोडी माहितीय की पुरुष चालवतोय की महिला! सामाजिक जबाबदारी.. आमचा असाही विश्वास आहे की रायडर असण्याने समाजाप्रतीही मोठी जबाबदारी येते. त्यामुळे आम्ही अनेक जनजागृती उपक्रम राबवतो. आपला समाज अनेकदा रोडीजला ड्रग्ज, मासोकिझम आणि महिलाविरोधी घडामोडींशी जोडतो. आतापर्यंत आम्ही अमली पदार्थ विरोधी मॅरेथॉन, दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘तिचा आदर करा’ कॅम्पेन आणि अनेक वाहतूक जागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरादरम्यान आमच्या क्लबने मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवले. आम्ही संकटकाळी धावून गेलो, याचा आजही आम्हाला अभिमान आहे. कुटुंबही सहभागी.. मी वरती सांगितल्याप्रमाणे हा क्लब म्हणजे एक कुटुंब आहे. अनेक बाईक क्लबमध्ये स्त्री-पुरुष दोन्हीही पाहायला मिळतात. मात्र, आमच्या क्लबमध्ये आम्ही आमच्या कुटुबालाही सहभागी करतो. अगदी बायकोपोरांसह सगळे क्लबमध्ये येतात. बाईक राईड शिकतात. आम्ही आमच्या बायकांनाही राईडला घेऊन जातो. मी स्वतः माझ्या लग्नानंतर बायकोला घेऊन हिमाचल प्रदेशला गेलो आहे. माझा मुलगा आता लहान आहे. पण, भविष्यात आम्ही त्यालाही सोबत घेऊन जाणार आहे. भारत जोडला.. अनेकजण आम्हाला प्रश्न विचारतात की बाईक रायडींग करून तुम्हाला काय मिळतं? खरंतर या प्रश्नाचं उत्तर शब्दाच देणं अवघड आहे. मात्र, यामुळे आपल्या देशाची नव्यानं ओळख झाली आहे. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आणि गुजरात ते पश्चिम बंगाल आपला देश किती विविधतेने नटला आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. मात्र, इथली संस्कृती, लोकंही भन्नाट आहेत. आजपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी गेलो आहे, तिथं हक्काची माणसं जोडली गेलीत. पुन्हा कधीही त्या शहरात, गावात किंवा खेड्यात गेलो तर अर्धा रात्री धावत येणारी माणसं कमावणं मला जास्त महत्वाचं वाटंत. या राईडमधून मला आनंद तर मिळतोच. पण, यामुळे भारताशी नव्याने जोडलो गेलो, याचा जास्त आनंद होतो. ‘बेलट बुद्धा’च का? खरंतर या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. ‘बुलेट बुद्धा’ मधील बुलेट हा शब्द बाईकवरुन घेतला आहे. तर बुद्ध शातीचं प्रतिक आहे. बुलेट ही खूप शक्तीशाली दुचाकी आहे. मात्र, तरीही ती शांत भासते, अगदी बुद्धांप्रमाणेच. बाईक चालवाना हा विचार आमच्या नेहमीच मनात असतो. लजीत, केरळ (बुलेट बुद्धा क्लब सदस्य) Adventure On Wheel | एकदा ठरवलं की काहीही असाध्य नाही, बुलेटला किक मारली अन् रस्ते तुडवले तेव्हा कळलं वय आडवं येत नाही! तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या