'HTTPS' Secure Sockets Layer किंवा Transport Layer Security चा उपयोग करुन युजरचं कनेक्शन एन्क्रिप्ट करतं. म्हणजेच ट्रान्सफर केलेला डेटा तुमच्या आणि रिसीवींग पार्टीमध्येच राहतो. याला कोणी हॅकर, स्कॅमर रीड करू शकत नाही.
नवी दिल्ली, 18 मे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर, दुसरीकडे सायबर क्राईमच्या (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर क्रिमिनल्सनी (Cyber Criminals) दुसऱ्यांची कमाई लुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सायबर क्रिमिनल्स अनेक मार्गांनी इतरांच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचं काम करतात. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील एका खासगी कंपनीत अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर फ्रॉडने (Cyber Fraud) 1 लाख 80 हजार रुपये काढून घेतले आहेत. हे काम करण्यासाठी चोरांनी फिशिंग लिंकचा वापर केला होता. फिशिंग लिंक म्हणजेच खऱ्या लिंकप्रमाणेच दिसणारी फेक लिंक असते. या महिलेने त्या लिंकवर क्लिक करताच तिचा फोन हॅकर्सनी हॅक केला आणि त्यांनी तिच्या अकाउंटमधील सर्व पैसे लांबवले. याप्रकरणी महिलेनं 16 मे 2022 रोजी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त प्रसिद्ध केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलंय, ती 9 मे रोजी विलेपार्ले (पश्चिम) येथील तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती. त्याचवेळी तिच्या फोनवर लिंक असलेला टेक्स्ट मेसेज (Text Message) आला. या मेसेजमध्ये तिला पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितलं होतं. महिलेला वाटलं की हा बँकेचा मेसेज आहे. त्यामुळे तिने लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर तिथं एचडीएफसी बँकेचं (HDFC Bank) बनावट वेबपेजही उघडलं. तिथं तिला तिचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकण्यास सांगण्यात आलं. ते टाकताच तिच्या फोनवर OTP आला. यानंतर तिला ओटीपी आणि पॅन नंबरची माहिती विचारण्यात आली. महिलेने तिचा ओटीपी आणि पॅन कार्ड डिटेल (PAN Card Details) टाकताच तिच्या बँक खात्यातून 1.80 लाख रुपये काढण्यात आले. तिच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा मेसेज बघताच महिलेला धक्का बसला आणि तिने बँकेत फोन करून अकाउंट ब्लॉक केलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही फ्रॉड लिंकवर क्लिक करू नका - या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. पोलीस अधिकार्यांच्या मते, युजरचा निष्काळजीपणा हा सायबर फसवणुकीच्या घटनांमागचं मुख्य कारण आहे. कोणतीही बँक पॅन किंवा आधार अपडेट करण्यासाठी फोनवर अशी लिंक पाठवत नाही किंवा कोणाला कॉलही करत नाही, हे लक्षात ठेवा. असा कॉल किंवा मेसेज अथवा लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका नाहीतर सायबर चोर तुमची फसवणूक करतील. ओटीपी शेअर करू नका - पोलिसांच्या मते, कोणत्याही प्रकारची लिंक (Fraud Link) फोनवर आली असेल त्यावर कधीही क्लिक करू नका. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो आणि तुम्ही सायबर चोरीला बळी पडू शकता. चुकून लिंकवर क्लिक केल्यास त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि फोन रीस्टार्ट करा. तसंच, तुमचा ओटीपी कधीच कोणालाही सांगू नका. या OTP च्या मदतीनेच तुमच्या खात्यातून पैसे चोरले जातात. तसंच लिंक चुकून ओपन केली तरी त्यात मागितलेले डिटेल्स भरु नका. हल्ली सायबर फ्रॉडचं प्रमाण खूप वाढलंय, त्यामुळे खबरदारी घेणं आवश्यक आहे. नाहीतर सायबर चोरांच्या अशा खोट्या मेसेजला बळी पडून तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.