नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : व्हॉट्सॲप (WhatsApp) सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग ॲप (MessagingApp) आहे. व्हिडीओज आणि कॉलिंगच्या माध्यमातून कनेक्ट राहण्याकरता व्हॉट्सॲपचा सर्वाधिक वापर केला जातो. ॲपची वाढती लोकप्रियता पाहता व्हॉट्सॲपने आपल्या प्लॅटफॉर्मवर आर्थिक व्यवहाराकरता सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या व्हॉट्सॲप पेमेंटलाही (WhatsApp Payments) युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने भारतात मंगळवारी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन पेमेंटस बॅकग्राउंड (Payments Background) ही सुविधा लाँच केली आहे. या सुविधेमुळे मनी ट्रान्सफर (Money Transfer) करणं युजर्ससाठी अधिक सुलभ होईल असा दावा व्हॉट्सॲपने केला आहे. व्हॉट्सॲपने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अनेक महिन्यांच्या टेस्टिंगनंतर व्हॉट्सॲप पेमेंट सर्व्हिस सुरू केली. आता ॲक्सिस बँक (Axis), एचडीएफसी बॅंक (HDFC), आयसीआयसीआय बॅंक (ICICI) आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) या बॅंक भागीदारांचा समावेश आहे. युजरला पर्सनलाइज्ड पेमेंटचा (Personalized Payment) अनुभव मिळावा, या उद्देशाने व्हॉट्सॲपने हे नवं फीचर लाँच केलं आहे. ज्यावेळी व्हॉट्सॲप पेमेंटसच्या माध्यमातून पैसे पाठवाल त्यावेळी, बॅकग्राउंड निवडण्याचं स्वातंत्र्य या फीचरच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. ही फीचर देशातील अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) अशा दोन्ही युजर्सला आता वापरता येणार आहे. मित्रांना आणि कुटुंबीयांना व्हॉट्सॲप पेमेंटसवरुन पैसे ट्रान्सफर करताना युजरला आपलेपणा वाटावा, या उद्देशाने हे पेमेंटस बॅकग्राऊंड फीचर लाँच करण्यात आल्याचं व्हॉट्सॲपने स्पष्ट केलं आहे.
सध्या व्हॉट्सॲपने 7 बॅकग्राऊंडची एक लिस्ट या सुविधेसाठी समाविष्ट केली आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पैसे ट्रान्सफर कराल, तेव्हा या लिस्टमधील एक योग्य बॅकग्राऊंड तुम्ही निवडू शकता. व्हॉट्सॲप पेमेंटसच्या माध्यमातून तुम्ही नव्याने पैसे पाठवत असाल, त्यावेळी Send Payment या स्क्रिनवरील बॅकग्राऊंड आयकॉनवर टॅप करुन तुम्ही तुमच्या आवडीचं बॅकग्राऊंड निवडू शकता. या आयकॉनवर टॅप केल्यानंतर खालील बाजूस बॅकग्राऊंडची यादी दिसेल. यातून तुम्ही तुमच्या पेमेंटसाठी योग्य वाटणारं बॅकग्राऊंड निवडू शकता.
पैसे पाठवण्यावेळी बॅकग्राऊंडसह तुम्ही एक नोट देखील पेमेंट करताना जोडू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यावर समोरील युजर रकमेसह तुम्ही पाठवलेलं बॅकग्राऊंड पाहू शकेल. विशेष म्हणजे या बॅकग्राऊंड लिस्टमध्ये थीमबेस्ड (Theme Based) बॅकग्राऊंडचाही समावेश करण्यात आला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर रक्षाबंधनच्या निमित्ताने बहिण-भाऊ या बॅकग्राऊंडचा वापर पैसे पाठवताना करु शकतात. तसंच या यादीत वाढदिवस, सुट्टया किंवा प्रवासानिमित्ताने पैसे पाठवताना उपयुक्त ठरणाऱ्या बॅकग्राऊंडचाही समावेश करण्यात आला आहे.