नवी दिल्ली, 6 मे: देशी ट्विटर (Indian Twitter) अशी ओळख असणाऱ्या भारतीय भाषांची सुविधा देणाऱ्या ‘कू’ (Koo) या अॅपनं आता ‘टॉक टू टाइप’ (Talk To Type) हे नवीन फीचर दाखल केलं आहे. प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (Indian Regional Languages) ‘टॉक टू टाइप’ ही सुविधा देणारं ‘कू’ हा जगातला पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. आता हे अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला भारतीय भाषेत बोलून संदेश पाठवता येणार आहे. म्हणजे आता युजर्सना पोस्ट टाईप करण्याची गरज नाही. ते आपल्या आवाजात बोलतील तो संदेश आपोआप टाईप केला जाईल. विशेष म्हणजे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्यानं स्थानिक भाषेत संदेश टाईप करण्यात अडचणी येणाऱ्या युजर्सना सोयीचे ठरणार आहे. युजर आपल्या भाषेतच संदेश बोलू आणि टाईप करू शकतात. सध्या हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, कन्नड, गुजराती, बंगाली, मराठी, पंजाबी, उडिया आणि आसामी भाषेत ही सुविधा उपलब्ध आहे. फेसबुक, ट्विटर किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर (Facebook, Twitter Platforms) असे फीचर अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळं सोशल मीडीयावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असणाऱ्या ट्विटरला पर्याय मानलं जाणारं ‘कू’ अॅपदेखील (Koo App) सर्वसामान्य युजर्समध्येही लोकप्रिय होईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावाटका यांनी हे मायक्रोब्लॉगिंग अॅप दाखल केलं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये केंद्र सरकारनं आयोजित केलेल्या आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन स्पर्धेत या अॅपनं विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय युजर्सना डोळ्यासमोर ठेवून भारतीय भाषांमधील मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून हे अॅप तयार करण्यात आल्याचं ‘कू’चे सहसंस्थापक मयंक बिदावाटका यांनी म्हटलं आहे.
‘कू’ वरील युजर्स कोणाही अनोळखी युजरला संदेश देऊ शकत नाहीत आणि तुम्हाला एखाद्याला संदेश पाठवायचा असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागेल, असंही मयंक बिदावाटका यांनी म्हटलं आहे. या अॅपवर युजर्स पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो शेअर करू शकतात. एकमेकांशी चॅटही करू शकतात. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. आतापर्यत लाखो लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं असून अनेक प्रसिद्ध व्यक्ती तसंच अनेक केंद्रीय मंत्र्यांनी याचा वापर सुरू केला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल यांचा समावेश आहे.