नवी दिल्ली, 23 जून : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आला होता. परंतु आता परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येताना दिसते आहे. अशात जे लोक नवा व्यवसाय सुरू करू इच्छितात, परंतु भांडवल अतिशय कमी आहे, अशा लोकांसाठी व्यवसायाची एक चांगली संधी आहे. हा व्यवसाय केवळ 25 हजारात सुरू करता येऊ शकतो. त्याबदल्यात दर महिन्याला जवळपास 50 हजार रुपये उत्पन्न मिळू शकतं. हा व्यवसाय कार वॉशिंगचा आहे. छोट्या मशीनपासून सुरुवात - कार वॉशिंगच्या प्रोफेशनल किंवा कमर्शियल मशीन एक लाख रुपयांपर्यत येतात. परंतु तुमच्याकडे इतक्या कार येतील, की नाही याबाबत जोपर्यंत अंदाज येत नाही तोपर्यंत या मोठ्या मशीन्सकडे वळू नये. मार्केटमध्ये कमर्शियल मशीन 12 हजार रुपयांपासून सुरू होतात. यात 2 हॉर्स पॉवरच्या मोटर लावल्यास जवळपास 14 हजार रुपयांपर्यंत मशीन जाऊ शकते. यात पाईपपासून नोजलपर्यंत सर्वकाही सामिल आहे. त्याशिवाय 30 लीटर वॅक्यूम क्लिनर घ्यावा लागेल, जो जवळपास 9 ते 10 हजारांपर्यंत मिळतो. वॉशिंगचं सामान शॅम्पू, ग्लोव्ह्ज, टायर पॉलिश, डॅशबोर्ड पॉलिशचा पाच लीटरचा कॅन घेतल्यास जवळपास 1700 रुपयांपर्यंत येईल.
दुकानाच्या लोकेशनसाठी या गोष्टी लक्षात ठेवा - कार वॉशिंग सेंटर सुरू करण्यासाठी सर्वात आधी चांगलं लोकेशन पाहावं लागेल. जिथे सोसायटी असतील किंवा कार संबंधित गोष्टींचं मार्केट असेल. लोकेशन असं निवडा जिथे पार्किंग स्पेस असेल आणि गाड्या जाण्या-येण्यास जागा असेल. दुकान स्वत:चं असेल तर उत्तम, अन्यथा एखाद्या मेकॅनिकच्या दुकानासह त्याला अर्ध भाडं देऊ शकता आणि तिथेच वॉशिंग काम सुरू करता येऊ शकतं. यामुळे पैसेही वाचतील आणि त्या भागात ग्राहकांची संख्या किती तेदेखील समजेल.
शहरांनुसार असेल वॉशिंग चार्ज - कार वॉशिंगचा चार्ज प्रत्येक शहरावर अवलंबून असतो. छोट्या शहरांत 150 रुपयांत छोट्या ऑल्टो, क्वीड सारख्या कार वॉशिंग होतात. तर मोठ्या शहरांत याच कार्ससाठी 250 रुपयांपर्यंत चार्ज घेतला जातो. तर स्विफ्ट डिझायर, हुंदाई सारख्या कार 350 आणि एसयूव्हीसाठी 450 रुपयांपर्यंत चार्ज आहे.