पुणे, अमरावती, परभणीसह राज्यातील पासपोर्ट केंद्रांतील सर्व्हर डाऊन; नागरिकांना मनस्ताप
मुंबई, 25 जुलै: आज सकाळपासून राज्यातील विविध पासपोर्ट केंद्रामध्ये सर्व्हर डाऊन (Server Down issue) असल्यामुळं कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळं पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट केंद्रांवर आलेल्या हजारो नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत राहावं लागलं आहे. पुणे, अमरावती, परभणीसहराज्यातील काही पासपोर्ट केंद्रामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे गोंधळ उडाला. पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना याची कोणतीही सूचना न दिल्यानं नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुणे पासपोर्ट केंद्रातील सर्व्हर डाऊन- पासपोर्ट ही गोष्ट पूर्वीप्रमाणं फक्त उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. अलीकडच्या काळात सर्वसामान्य लोकही पासपोर्ट काढत असतात. देशात सध्या 250च्या असपास पासपोर्ट केंद्र असून महाराष्ट्रातही त्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातील घोरपडी येथील पासपोर्ट केंद्रावर फक्त पुण्यातूनच नाही, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील नागरिकही पासपोर्ट काढण्यासाठी येत असतात. येथील पासपोर्ट केंद्रावर नागरिकांची पासपोर्टसाठी नेहमी गर्दी असते. मात्र इथल्या गलथान कारभारचा अनुभव नेहमीच नागरिकांना येत असतो. आजही पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांचा खोळंबा झाला. हेही वाचा- Women Rights: विवाहित स्त्रीला कायद्यानं मिळतात ‘हे’ हक्क, छळ करणाऱ्यांना आणू शकतात वठणीवर
सकाळी 9 वाजल्यापासून सुमारे एक हजार लोक पासपोर्ट काढण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. परंतु येथील पासपोर्ट केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यानं कामाचा गोंधळ उडाला. दरम्यान सकाळपासून ही समस्या असतानाही बाहेर उपस्थित असणाऱ्या लोकांना त्याची कल्पना पासपोर्ट कार्यालयातर्फे देण्यात आली नाही. त्यामुळं लोकांना पासपोर्ट केंद्राबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं. याविषयी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं अनेक लोकांचा हेलपाटा फुकट गेला आहे. त्यामुळं नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती आणि परभणीतही कामाच खोळंबा- दरम्यान पुण्याप्रमाणेच अमरावती आणि परभणी जिल्ह्यातील पासपोर्ट केंद्रामध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळं काम ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीमध्येही सकाळपासून पासपोर्ट केंद्रावर रांगा लागल्या होत्या. परंतु सर्व्हरच्या समस्येमुळं येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे परभणीतील पासपोर्ट सेवा केद्रातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. येथे पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं आहे.