थेट अंतराळातून 24 तास मिळू शकणार सौर ऊर्जा
मुंबई, 08 जुलै : दिवसेंदिवस ऊर्जेला मागणी वाढत आहे. त्या तुलनेत पुरवठा होत नाही. ऊर्जेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संशोधक वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करत आहेत. गेल्या काही वर्षांत सौर ऊर्जेचा वापर वाढला आहे. अनेक देशांनी सौर ऊर्जावापराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सध्या सूर्यप्रकाश आणि सौर पॅनेलच्या माध्यमातून ही ऊर्जा मिळते. भविष्यकाळात ही ऊर्जा थेट अंतराळातून मिळवता येणार आहे. त्यातून आठ पट वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. प्रथमच अंतराळातून सौर ऊर्जा मिळवण्यात संशोधकांना यश आलं आहे. पृथ्वीवर 24 तास आणि सातही दिवस सौर ऊर्जा मिळावी यासाठी संशोधकांनी अंतराळात सोलर पॅनेल्स पाठवली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे. हा प्रयोग नेमका कसा आहे, ते जाणून घेऊ या. `दैनिक भास्कर`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. अंतराळातल्या सौर ऊर्जा केंद्राची संकल्पना खूप जुनी आहे. 1940च्या दशकात विज्ञानकथा लेखक आयझॅक असिमोव्ह यांनी त्यांच्या ‘रिझन’ या लघुकथेत त्याचा उल्लेख केला आहे. आता संशोधकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पृथ्वीला 24 तास सौर ऊर्जा मिळावी म्हणून संशोधकांनी अवकाशात सौर पॅनेल्स पाठवली. संशोधकांनी जानेवारी 2023मध्ये मॅपल नावाचं अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत सोडलं होतं. त्यात सौर पॅनेल्स होती. ही पॅनेल्स अंतराळातलं तापमान आणि सौर किरणोत्सर्ग सहन करू शकत होती. यातून पृथ्वीवर प्रथमच सौर ऊर्जा मिळाली असून, संशोधकांच्या प्रयत्नाला यश मिळालं आहे. अंतराळात बसवलेली सौर पॅनेल्स पृथ्वीवरच्या पॅनेलपेक्षा आठपट जास्त ऊर्जा देऊ शकतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर अंतराळातून मिळालेली सौर ऊर्जा पृथ्वीवर आठपट जास्त वीज निर्माण करू शकते, असा संशोधकांना विश्वास आहे. Tech News: प्रायव्हेट WhatsApp चॅट Gmail वरही करता येते सेव्ह, ही आहे ट्रिक! थेट अंतराळातून सौर ऊर्जा मिळवण्यासाठी संशोधकांनी मॅपल हे यान सोडलं होतं. मॅपलमध्ये (MAPLE) अनेक मायक्रोवेव्ह पॉवर ट्रान्समीटर्स लावलेले आहेत. ते लवचिक आणि कमी वजनाचे असतात. हे ट्रान्समीटर्स सिलिकॉनपासून तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून काम करतात. हे ट्रान्समीटर्स सौर ऊर्जेचं लेझरमध्ये (मायक्रोवेव्ह) रूपांतर करतात, जेणेकरून ऊर्जा पृथ्वीवर सहज पाठवली जाऊ शकते. हे पृथ्वीवरच्या ऊर्जा पुरवठा स्टेशन्ससारख्या इच्छित ठिकाणी पाठवले जाऊ शकतात. हे स्टेशन राष्ट्रीय ग्रीडमध्ये वीजपुरवठा करू शकतं. मॅपलकडून पाठवली गेलेली ऊर्जा कॅलिफोर्नियातल्या पासाडेना इथल्या कॅल्टेकच्या कॅम्पसमधल्या रिसीव्हरवर आल्याचं दिसून आलं. ही ऊर्जा अपेक्षित वेळेत आणि वारंवारिता अर्थात फ्रिक्वेन्सीवर प्राप्त झाल्याचं संशोधकांनी सांगितलं. `या दरम्यान, आम्ही पहिल्यांदाच अंतराळात वायरलेस ऊर्जा हस्तांतरण पाहिलं. आम्ही एक अतिशय हलकं अवकाशयान बनवले. त्याने सूर्यकिरणांपासून विजेची निर्मिती केली आणि कोणत्याही वायरच्या मदतीशिवाय ही वीज दूरवर (पृथ्वीवर) पाठवली,` असं एका संशोधकाने सांगितलं. `बीबीसी`च्या वृत्तानुसार, पृथ्वीच्या कक्षेत मोठे उपग्रह पाठवले जातील. हे उपग्रह सौर ऊर्जा निर्माण करून पृथ्वीच्या दिशेने पाठवतील. ब्रिटनच्या स्पेस एनर्जी इनिशिएटिव्हचे (SEI) सह-अध्यक्ष मार्सियन सोल्ताऊ यांनी सांगितलं, `या प्रकल्पाची क्षमता अमर्याद आहे. सैद्धांतिकदृष्ट्या ते 2050मध्ये संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवठा करू शकेल.` 18व्या शतकापासून पृथ्वीवर सौर पॅनेलद्वारे सौर ऊर्जा वापरली जात आहे. हे सौर पॅनेल सौर सेल्सनी बनलेले असतात. सौर सेल्स हे असं उपकरण आहे, जे सूर्याच्या किरणांमधल्या ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतर करतात. आजही जगातली चार टक्के वीज सौर पॅनेलमध्ये येते. इंधनावर आधारित ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेचा वापर केला जावा, असं संशोधकांना वाटतं. तथापि, पृथ्वीवर पूर्ण वेळ सूर्यप्रकाश नसल्याने हे शक्य नाही. अनेक देशांमध्ये बहुतेकदा ढगाळ हवामान असतं. अशा स्थितीत 24 तास सौर ऊर्जा मिळणे शक्य नाही. त्यामुळे संशोधकांनी अवकाशातून पृथ्वीवर सौर ऊर्जा पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अंतराळात ज्या ठिकाणी ही सौर पॅनेल्स पाठवण्यात आली आहेत आणि येत्या काळात पाठवली जातील, तेथे ढग नाहीत, दिवस-रात्रीचं चक्रदेखील नाही. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय सौर ऊर्जा संकलित करता येऊ शकते. अंतराळात सूर्याचा ऊर्जा पुरवठा खूप जास्त आहे आणि पृथ्वीच्या उच्च कक्षेत मोठ्या उपग्रहांसाठी भरपूर जागा आहे. पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेभोवती एक पातळ पट्टी दर वर्षी 100 पट जास्त सौर ऊर्जा प्राप्त करू शकते. ही ऊर्जा 2050मध्ये पृथ्वीवरचा मानव वापरू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.