नवी दिल्ली, 26 डिसेंबर : मागील काही वर्षांपासून Paytm, PhonePe, Google Pay सारख्या डिजीटल ट्रान्झेक्शन App च्या वापरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात या प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. ऑनलाइन ट्रान्झेक्शन करणं जितकं सोपं, सहज आहे, तितकं धोकादायकही ठरू शकतं. ऑनलाइन व्यवहारांमध्ये एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. नुकतंच एक फेक Paytm App चं प्रकरण समोर आलं आहे. एका रिपोर्टनुसार, हैदराबाद पोलिसांनी आठ लोकांना फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी यांच्याकडून 75 हजार रुपये जप्त केले आहेत. त्याशिवाय Fake Paytm App द्वारे फसवणुकीचे काही इतर प्रकारही गेल्या काही महिन्यांत समोर आले आहेत. सायबर क्रिमिनल्स फेक App द्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. हे App Paytm प्रमाणेच दिसत असल्याने अनेक जण यात अडकतात आणि मोठी रक्कम गमावतात.
Paytm च्या फेक App द्वारे एखाद्या दुकानातून काही सामान खरेदी केल्यास दुकानदाराला सामानाची किंमत, दुकान किंवा दुकानदाराच्या नावाने फेक रिसिप्ट दाखवून लूट केली जात आहे. हे फेक App दुकानदारांना पैसे रिसिव्ह झाल्याचं नोटिफिकेशनही दाखवतं, पण बँकमध्ये मात्र पैसे क्रेडिट होत नाहीत.
कसा होईल बचाव? दुकानदारांनी Paytm किंवा इतर कोणत्याही App द्वारे मिळणारं पेमेंट ट्रॅक करण्यासाठी सतत अकाउंट चेक करावं. तसंच Paytm द्वारा पेमेंट नोटिफिकेशन डिव्हाइस लावणं गरजेचं आहे, जे ट्रान्झेक्शन झाल्यानंतर दुकानदाराला बोलून पेमेंट रिसिव्ह झाल्याची माहिती देईल. यामुळे फेक App द्वारे रिसिप्ट क्रिएट केली जाणार नाही. तसंच कोणतंही पेमेंट करताना, QR code स्कॅन करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.