Data Loan: मोबाईलमधील डेटा संपला? मग डायल करा हा कोड, लगेच मिळेल क्रेडिट
मुंबई, 12 सप्टेंबर: सध्याच्या काळात बहुतांश गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्यामुळे इंटरनेटचं (Internet) महत्त्व खूप वाढलं आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) सातत्यानं खास डेटा प्लॅन (Data Plan) लॉंच करत आहेत. बऱ्याचदा आपण एखादं महत्त्वाचं काम करत असताना डेटा संपतो. त्यामुळे आपल्याला तातडीनं डेटाची (Data) गरज पडते. अशा वेळी आपण रिचार्ज करतो किंवा जवळच्या व्यक्तीकडे हॉटस्पॉट मागतो; पण असे पर्याय उपलब्ध नसतील तर अडचणीत आणखी भर पडते; मात्र आता ही अडचण दूर होणार आहे. कारण ग्राहकांना डेटा लोन (Data Loan) हा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. एअरटेल (Airtel) ही टेलिकॉम कंपनी सध्या डेटा लोन ऑफर करत आहे. अर्थात ही सुविधा फ्री नाही. यासाठी युझर्सना शुल्क द्यावं लागणार आहे; पण नेमक्या वेळेला डेटा उपलब्ध होणार असल्याने कामं पूर्ण होण्यास मदत होणार आहे. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अडीअडचणीला आपल्याकडे पैसे उपलब्ध नसतील तर आपण ते मित्र किंवा जवळच्या व्यक्तीकडून उधार घेत गरज भागवतो. आता याच पद्धतीनं डेटाची गरज भागवता येणार आहे. एअरटेलनं आपल्या युझर्ससाठी डेटा लोन ही नवी संकल्पना आणली आहे. या लोनच्या मदतीनं तुम्ही तात्काळ रिचार्ज करू शकता आणि इंटरनेटअभावी रखडलेली कामं पूर्ण करू शकता. याचाच अर्थ डेटा नसतानाही तुम्ही तुमची गरज भागवू शकता. एअरटेल युझर्सना मिळणारं हे लोन अर्थात कर्ज निःशुल्क (Free) नक्कीच नाही. या सुविधेसाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. ग्राहकांना हे कर्ज ठरावीक वेळेत परतफेड करावं लागणार आहे. यासाठी तुम्ही एअरटेल थॅंक्स अॅपचा (Airtel Thanks App) वापर करू शकता. एअरटेल डेटा लोन घेण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या डायलरमध्ये (Dialer) जावं लागेल. तिथं तुम्हाला *147*567# हा कोड डायल करावा लागेल. हा कोड डायल केल्यावर एअरटेल तुम्हाला नेटवर्कचे विविध पर्याय देईल. तुम्ही 2G,3G किंवा 4G नेटवर्कपैकी एक पर्याय निवडू शकता. या लोनसाठी तुम्हाला अजून सोपी पद्धत हवी असेल तर तुम्ही 52141 डायल करू शकता. हा क्रमांक डायल केल्यावर तुम्हाला काही सूचना फॉलो कराव्या लागतील आणि त्यानंतर डेटा लोन मिळेल. युझर्ससाठी ही सुविधा नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे. यामुळे डेटाअभावी अपूर्ण राहिलेली कामं युझर्सना तातडीने पूर्ण करता येतील.