मुंबई, 26 जानेवारी: आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपली अनेक छोटी आणि अनेक महत्त्वाची कामं स्मार्टफोनच्या माध्यमातूनच पूर्ण होतात. आपल्याला स्मार्टफोन्सपासून फार वेळ लांब राहणं शक्य होत नाही. अनेक जण रात्री फोन उशाजवळ ठेवूनच झोपतात. तसंच सकाळी उठल्यानंतर अनेक जण आधी फोन शोधतात असं म्हटल्यास अजिबात चुकीचं ठरणार नाही. लॉकडाउन काळात तर स्मार्टफोन हाच एकमेव आधार बनला होता. स्मार्टफोनवरचं कोणतंही काम इंटरनेटशिवाय होत नाही. इंटरनेटसाठी अनेकांच्या घरात वाय-फाय बसवलेलं असतं; मात्र काही जण मोबाइल डेटावर (Mobile Data) अवलंबून असतात. जास्त वापरामुळे डेटा (Data) दिवसभर पुरत नाही. डेटा पॅक संपल्यानंतर अनेक कामं अडून राहतात. त्यामुळे डेटा वाचवण्याच्या काही टिप्स (How to Save Mobile Data) तुम्हाला सांगत आहोत. डेटा दिवसभर टिकवण्यासाठी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे आपल्या फोनमध्ये डेटा लिमिट सेट करणं हा आहे. यासाठी तुम्हाला मोबाइलमधल्या डेटा वापर पर्यायावर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला डेटा लिमिट आणि बिलिंग सायकल हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करावं. तिथे तुम्ही डेटा लिमिट सेट करू शकता. तुम्ही 1GB लिमिट सेट केलं, तर 1GB संपल्यानंतर इंटरनेट आपोआप बंद होईल. म्हणजेच तुम्ही सेट केलेली मर्यादा संपल्यानंतर फोनमधलं इंटरनेट बंद होईल. हे वाचा- TRICK: Instagram अकाउंटवरुन कशाप्रकारे लॉग इन करता येईल Facebook? मोबाइल डेटा वापरत असताना अधिक डेटा लागणाऱ्या अॅप्सचा वापर कमी करावा. उदाहरणार्थ, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक डेटा लागतो. तसंच, जास्त जाहिराती दाखवणाऱ्या अॅप्सपासून दूर राहा. यामुळेदेखील तुमचा डेटा संपतो. तुम्ही ही अॅप्स वापरणं बंद केलं, तर डेटा वाया जाणार नाही. हे वाचा- लॉक झालंय Gmail Account? अशाप्रकारे पुन्हा करा सुरू, आहेत सोप्या स्टेप्स डेटा सेव्हर हा मोडदेखील एक उत्तम पर्याय आहे. डेटा वाचवण्यासाठी किंवा डेटाचा वापर कमी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, फोनमध्ये अनेक अॅप्स आपोआप अपडेट होत असतात. त्यामुळे फोनचा डेटा खूप जास्त प्रमाणात खर्च होतो. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन ऑटो अपडेट बंद करावं लागेल आणि Auto Update Apps Over WiFi Only हे सिलेक्ट करावं. यामुळे जेव्हा वायफाय उपलब्ध असेल तेव्हाच मोबाइलमधली अॅप्स अपडेट होतील. यामुळे दिवसभर तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. या टिप्सचा वापर करून तुम्ही डेटाचा योग्य रीत्या वापर करून आनंद घेऊ शकता.