नवी दिल्ली, 16 जुलै : अंतराळातील (Universe) इतर ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते का, याबाबत शास्त्रज्ञ गेली अनेक दशकं शोध घेत आहेत. आजवर काही ग्रहांवर पाणी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे त्या ग्रहांवर जीवसृष्टीही असेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र, आता जेम्स वेब या अंतराळातील दुर्बिणीला पृथ्वीसारखाच एक ग्रह सापडला आहे. त्यावर पाणी आणि ढगही (Water And Clouds On Planet) आहेत. त्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जेम्स वेब इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध लावू शकते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. आज तक हिंदीनं याबाबत वृत्त दिलं आहे. अंतराळातील घडामोडींबाबत माहिती मिळवण्यासाठी जेम्स वेब (James Webb Space Telescope) या दुर्बिणीची योजना करण्यात आली होती. आता ही दुर्बिण अंतराळातील इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा वेध घेण्यासही सक्षम असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. सौरमंडळात अनेक ठिकाणी जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. जिथे पाणी सापडेल, तिथे तर जीवसृष्टी असण्याची शक्यता दाट होते. मंगळ (Mars) आणि गुरु (Jupitar) ग्रहाचा चंद्र युरोपा (Europa) याच्या पृष्ठभागाच्या वर आणि खालीही जलस्त्रोत असल्याचे पुरावे सापडले आहेत. पण तिथे जीवसृष्टीचा शोध घेणं कठीण आहे, कारण तिथे पोहोचताच येत नाही. आजवर त्यासाठी कोणताही लँडर किंवा रोव्हर तयार करण्यात आला नाहीये. सूर्याच्या व्यतिरिक्त इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांवरही म्हणजे एक्सोप्लॅनेट्सवर जीवसृष्टी असू शकते, असं शास्त्रज्ञांना वाटतंय. तिथलं जीवन पृथ्वीपेक्षा अधिक प्राचीनही असू शकतं. सैद्धांतिक गणनेनुसार आकाशगंगेमध्ये 30 कोटी ग्रह राहण्यायोग्य असू शकतात. यातील काही पृथ्वीच्या आकाराचे आहेत. ते पृथ्वीपासून 30 प्रकाशवर्षं इतक्या अंतरावर आहेत. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी केवळ 5 हजार एक्सोप्लॅनेट्सचा शोध लावला आहे. त्यापैकी शेकडो ग्रह राहता येण्यासारखे आहेत किंवा तिथे जीवसृष्टी असू शकते. नासाच्या दुर्बिणीने दाखवली सोलार सिस्टीम, गुरू ग्रहाचे असे फोटो तुम्ही पाहिले नसतील जेम्स वेब टेलिस्कोपने नुकतीच WASP -96b या मोठ्या ग्रहातून निघणाऱ्या प्रकाशतरंगांची पाहणी केली. त्यात तिथे पाणी आणि ढग असल्याचं दिसून आलं. हा ग्रह मोठा आणि गरम असल्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे. या दुर्बिणीतून एक्सोप्लॅनेट्सवरील जीवसृष्टी शोधता येईल. तिथल्या बायोसिग्नेचरवरून (Biosignature) तिथे जीवसृष्टी आहे की नाही हे पाहाता येईल. थोड्याच दिवसात TRAPPIST-1e या ग्रहाकडे जेम्स वेब आपला मोर्चा वळवणार आहे. हा ग्रह पृथ्वीएवढाच राहण्यायोग्य ग्रह आहे. पृथ्वीपासून 39 प्रकाशवर्षं इतक्या अंतरावर आहे. जेम्स वेब या दुबिर्णीतून जीवसृष्टी शोधण्यासाठी बायोसिग्नेचर ओळखण्याची सोय आहे. एखाद्या ग्रहाच्या वातावरणात असलेल्या कार्बड डाय ऑक्साईड, मिथेन आणि वाफेत होणाऱ्या बदलाची नोंद करण्याची क्षमता जेम्स वेबमध्य़े आहे. या गॅसेसच्या मिश्रणातूनच जीवसृष्टी असल्याचे संकेत मिळू शकतात. जेम्स वेबच्या माध्यमातून ग्रहांवरील जीवसृष्टी ओळखणं सोपं होणार आहे. अनेक ग्रहांच्या वातावरणात किंवा पृष्ठभागावर जीवसृष्टी वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. मात्र ती कोणत्याही रूपात असेल, तरी ती आपल्यापाठी बायोसिग्नेचर ठेवत असते. जेव्हा सौरमंडळ तयार झालं, तेव्हा पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन नव्हता. पण एकपेशीय जीव (Single Cell Life) अमिबा होता. सुरुवातीला पृथ्वीवर बायोसिगनेचर खूपच अस्पष्ट होते. हळूहळू 240 कोटी वर्षांमध्ये ते बदलले. शेवाळं (Algae) तयार होऊ लागल्यापासून ते बदलायला सुरुवात झाली. शैवाल अर्थात शेवाळ्यानं ऑक्सिजन तयार करायला सुरुवात केली. हळूहळू पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं. त्यामुळे जीवसृष्टीही वाढली. जेव्हा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून आरपार जाऊ लागला, तेव्हा बायोसिग्नेचर दिसू लागते. सूर्यप्रकाश जेव्हा एखाद्या ग्रहाच्या वातावरणाला भेदून जातो, तेव्हाच बायोसिग्नेचर दिसतात. त्यामुळे जीवसृष्टी असण्याचा पुरावा असलेल्या काही वायूंना ओळखता येऊ शकतं. झाडांमधील क्लोरोफिलमुळे (Chlorophyll) प्रकाश आत घेता येऊ शकतो. हे प्रकाश किरणांमधील लाल आणि निळा रंग शोषून घेते. त्यामुळे आपल्याला झाड हिरवे दिसते. याच तंज्ञाचा वापर करून जेम्स वेबही इतर ग्रहांच्या वातावरणातील जीवसृष्टी शोधू शकेल. या दुर्बिणीमध्ये असलेले मोठे इन्फ्रारेड कॅमेरे विविध प्रकाश तरंगांचा अर्थ लावू शकतात. या प्रकाशतरंगांमध्ये काही फरक दिसला, तर तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता या दुर्बिणीद्वारे ओळखता येईल. आजवर अंतराळात अशा प्रकारे जीवसृष्टीचा वेध घेणारी एकही दुर्बिण नव्हती. सध्या याच पद्धतीचे तीन टेलिस्कोप तयार करण्याचं काम सुरू आहे. जायंट मॅगेलेन टेलिस्कोप, थर्टी मीटर टेलिस्कोप आणि युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप हे तीन टेलिस्कोप सध्याच्या कोणत्याही टेलिस्कोपपेक्षा शक्तीमान आहेत. हे आपल्या सौरमंडळातील किंवा त्याबाहेरील एक्सोप्लॅनेटवरील ऑक्सिजनचा शोध घेऊ शकतील. त्यामुळे जीवसृष्टीचे पुरावेही सापडण्याची शक्यता आहे.